सातारा – डॉल्बीसाठी मॉडीफाय केलेल्या वाहनावर कारवाई

सातारा – डॉल्बी लावण्यासाठी मॉडीफाय केलेल्या वाहनावर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली. साऊंड सिस्टीम भाड्याने देणार्यावरही कारवाई करण्यात आली. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणपती आगमन सोहळ्यामध्ये डॉल्बी प्रतिबंधाच्या आदेशाचे उल्लंघन करणार्या डॉल्बीमालकांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, पोलीस उपअधीक्षक राजीव नवले यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांना दिल्या होत्या.
त्यानुसार, दि. 1 सप्टेंबर रोजी गणपती आगमन मिरवणुकीत सह्याद्री गणेश तरुण, कर्तव्य ग्रुप गणेश तरुण, अजिंक्यतारा गणेश या मंडळांसमोर डॉल्बीचा वापर करण्यात आला होता. या डॉल्बीचालकांवर न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत.
दि. 2 रोजी भुई गल्ली तरुण मंडळ, ढोणे कॉलनी यांची मिरवणूक राजवाडा ते देवी चौक जात असताना भुई गल्ली तरुण मंडळाने पाटील प्लस साऊंड सिस्टीम टेम्पो (एमएच-11-एफ-3147) वर लावून डॉल्बी प्रतिबंध आदेशाचे उल्लंघन केले. त्यावेळी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांनी या डेसिबल मीटरने मोजणी करून साऊंड सिस्टीम मालकावर कारवाई केली. या वाहनमालकाने वाहनात बेकायदेशीर बदल केल्याने, ते पुढील कारवाईसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे जमा करण्यात आले आहे.





