सातारा : परळी खोऱ्यातील नाराजांच्या हाती घड्याळ

भोंदवडेत राष्ट्रवादीचा मेळावा; शशिकांत वायकर यांची विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी नियुक्ती
ठोसेघर – परळी खोऱ्यातील भोंदवडे (ता. सातारा) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता मेळावा रविवारी झाला. यावेळी खोऱ्यातील काही नाराज कार्यकर्त्यांनी आ. शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने आणि जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. आ. शिवेंद्रसिंहराजे गटाचे नाराज कार्यकर्ते शशिकांत वायकर यांची सातारा-जावळी विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. वायकर हे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत डेरेदाखल झाले आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यात दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्याचा आ. शशिकांत शिंदे यांनी मेळाव्यात खरपूस समाचार घेतला. मुंबई, नवी मुंबईत वास्तव्यास असलेल्या परळी खोऱ्यातील कार्यकर्त्यांची कामे करण्याचे जबाबदारी आपली आहे, असे त्यांनी नमूद केले. शशिकांत वायकर यांच्याबाबत बोलताना आ. शिंदे म्हणाले, आम्हा दोघांचे नाव शशिकांत आहे. हल्ली कॉन्ट्रॅक्टरांचा जमाना आहे. सध्या तेच राजकारणी होतात.
आणखी मोठे कॉन्ट्रॅक्टर व्हा; परंतु गोरगरिबांची कामे करून, त्यांचे आशीर्वाद घ्या. आगामी निवडणुकांमध्ये परळी खोऱ्यातून राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतील. या भागात राष्ट्रवादी बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, परळी खोऱ्यातील घराघरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पोहोचवणार असल्याचे शशिकांत वायकर म्हणाले.
भाजपच्या ध्येयधोरणांवर सुनील माने यांनी टीका केली. राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, विद्यार्थी आघाडीचे वैभव राऊत, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष शफीक शेख, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, श्रीरंग देटे, प्रकाश चव्हाण, विष्णू पवार, प्रशांत कुरळे, सचिन जाधव व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवेंद्रसिंहराजेंचा नामोल्लेख टाळला
जावळीत दोन्ही आमदारांमध्ये रंगलेल्या वाग्युद्धाच्या पार्श्वभूमीवर आ. शशिकांत शिंदे या मेळाव्यात काय बोलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष होते; परंतु त्यांनी आ. शिवेंद्रराजेंचा नामोल्लेख कटाक्षाने टाळला. दिवंगत आ. अभयसिंहराजे यांच्याशी माझे जिव्हाळ्याचे संबंध होते. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी बळ दिले, म्हणूनच मी आमदार झालो, असे आ. शिंदे यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले.





