अहमदनगर – मुळा, भंडारदरा, निळवंडेतून 5 टीएमसी पाणी जायकवाडीकडे

नगर – गेल्या ऑगस्ट महिन्यापासून नगर व नाशिककरांना जी धास्ती होती ती अखेर आता खरी ठरत असून अभूतपूर्व दुष्काळाची परिस्थिती असतांनाही नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून तब्बल 8.603 टीएमसी पाणी औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरणात सोडण्याचा एकदाचा निर्णय झाला आहे. 31 ऑक्टोबरपासून हे पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सं. रा. तिरमनवार यांनी दिले असले तरी प्रत्यक्षात नियोजन व तयारी जलसंपदा विभागाला करावी लागणार असल्याने येत्या एक ते दोन दिवसात नगर जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा, निळवंडे या धरणांमधून 5 टीएमसी पाणी जायकवाडीकडे झेपावणार आहे.
दरम्यान, ऑक्टोबर हिटमुळे नदीपात्रातील ओला कमी झाला आहे. तरी सोडण्यात येणाऱ्या आठ टिएमसी पाण्यातील तब्बल 35 टक्के पाण्याचा नाश होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली असून त्यामुळे जायकवाडी धरणात पाच ते साडेपाच टीएमसी पाणी पोहोचणार आहे. मराठवाडा सिंचन विकास महामंडळाने आदेश दिल्यानंतर नगर येथील मुळा प्रकल्प व पाटबंधारे भंडारदार व निळवंडे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंत्यांकडून पाणी सोडण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहे. पाणी सोडण्याचे नियोजन व तयारी सुरू करण्यात आली आहे. आवश्यक त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे.
नाशिक जिल्ह्यातील 11 धरणांमधून एकूण तीन टीएमसी तर, अहमदनगर जिल्ह्यातील सहा धरणांमधून एकूण पाच टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात तेढ निर्माण होण्याची शक्यता दिसून येते. नगरसह नाशिक जिल्ह्यातही यंदा दुष्काळसदृश स्थिती आहे. नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये खरीप व रब्बी हंगामातील पिकेही होरपळली आहेत. दिवाळीनंतर काही तालुक्यात टॅंकर देखील सुरू करावे लागतील अशी स्थिती आहे.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांच्या कार्यालयात 17 ऑक्टोबर 2023 रोजी पाणी वाटपासंदर्भात बैठक पार पडली. मेंढीगिरी समितीच्या अहवालानुसार 15 ऑक्टोबरपर्यंत जायकवाडी धरणात 33 टक्क्यांपेक्षा कमी साठा असेल तर ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरण समूहांमधून पाणी सोडावे लागते. त्यादृष्टीने पाटबंधारे विकास महामंडळाने निर्णय घेत येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत एकूण 8.603 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, काश्यपी, गौतमी गोदावरी या धरणांतून 0.5 टीएमसी (500 द.ल. घ.फू.) इतके पाणी सोडावे लागेल. आळंदी, कडवा, भाम, भावली, बाकी, दारणा, मुकणे व वालदेवी या धरणांतून 2.643 टीएमसी इतके पाणी सोडावे लागणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील मांडओहोळ, मुळा धरणातून 2.10 टीएमसी, तर भंडारदरा, निळवंडे, आढळा, भोजापूर या धरणातून 3.36 टीएमसी सोडण्यात येणार आहे.





