सातारा – वीस सराईत गुन्हेगारांची शिरवळमध्ये काढली धिंड

खंडाळा – शिरवळ पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमध्ये परिसरातील सराईत गुन्हेगारांसह अवैध धंदा करणार्या 20 जणांची शिरवळ शहरातून धिंड काढण्यात आली. या कारवाईमुळे नागरिकांमधून पोलीस दलाचे अभिनंदन होत आहे.
शिरवळ पोलिसांनी गुरुवारी दि.21 केलेल्या कारवाईत हातभट्टी, दारु, मटका व्यवसायिक व सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले. या गुन्हेगारांना वारंवार संधी देवूनही सुधारत नसल्याने गुरुवारी (दि. 21 रोजी) पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक आंचल दलाल, फलटणचे पोलीस अधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली शिरवळ पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. परिसरात दहशत निर्माण करणारे तसेच अवैध धंदे करणार्यांची शिरवळ पोलीस स्टेशन परिसर, एसटी बसस्थानक परिसर, बाजारपेठसह संपूर्ण शहरातून धिंड काढण्यात आली. पोलिसांच्या या धडक कारवाईचे नागरिकांना चांगलेच औत्सुक्य वाटले होते.





