Satara : अकरावी ऑनलाइन प्रवेश सोमवारपासून

सातारा : राज्य शासनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने अकरावी प्रवेशाचे सुधारित ऑनलाइन वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार प्रवेश प्रक्रिया सोमवार दि. २६ मे ते दि. १८ जूनपर्यंत राबवण्यात येणार आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी दिली.
अकरावी प्रवेशाची पहिली फेरी दि. २६ मे रोजी सकाळी ११ ते दि. ३ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत होईल. तीमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणी व प्राधान्यक्रम निश्चितीसह अर्ज दाखल करून घेण्यात येणार आहेत. प्राधान्यक्रमाच्या यादीत किमान १ ते १० उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश करू शकतात. अर्जात दिलेल्या पसंती क्रमानुसार आरक्षण, गुण यांच्या आधारे प्रवेशासाठी उच्च माध्यमिक विद्यालयाचे वाटप केले जाईल.
विद्यार्थी कोटाअंतर्गत प्रवेशासाठी देखील अर्ज करू शकेल. दि. ५ जून रोजी तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. दि. ६ ते ७ जून रोजी तात्पुरत्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीबाबत विद्यार्थी हरकतीचे ऑनलाइन निराकरण केले जाणार आहे.
दि. ८ जून रोजी अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिध्द. दि. ९ जून रोजी कॅप फेरी प्रवेश, गुणवत्ता यादी आधारे विद्यार्थी व उच्च माध्यमिक शाळा निवड वाटप प्रक्रिया. दि. १० जून रोजी प्रवेश फेरीसाठी उच्च माध्यमिक विद्यालय निहाय विद्यार्थी वाटप यादी जागांची यादी जाहीर केली जाणार आहे. दि. ११ ते १८ जून अखेर विद्यार्थ्यांस मिळालेले विद्यालय निश्चिती केली जाणार आहे. दि. २० जून रोजी दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी जाहीर केली आहे, अशी माहिती श्री. चोपडे यांनी दिली.





