सासवड – आषाढी वारीसाठी संत सोपानकाका महाराजांचा पालखी सोहळा यंदा सोमवारी (दि. २३ जून ) सासवड येथील देऊळवाड्यातून सकाळी ११ वाजता पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. हा सोहळा ५ जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचेल, ६ जुलैला आषाढी एकादशी आहे, अशी माहिती सोपानदेव समाधी ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त ॲड. त्रिगुण गोसावी यांनी दिली. पालखी सोहळा २३ जूनला पिंपळे मार्गे पांगारे येथे पहिला मुक्काम करेल. २४ जूनला परिंचे, वीर मार्गे मांडकी येथील भैरवनाथ मंदिरात, तर २५ जूनला जेऊर, नीरा मार्गे निंबूत येथील विठ्ठल मंदिरात मुक्काम होईल. २६ जूनला निंबूतहून वाघळवाडी येथे दुपारचा विसावा आणि सोमेश्वरनगर येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात रात्रीचा मुक्काम असेल. २७ जूनला करंजे पूल, सोरटेवाडी, वडगाव निंबाळकर मार्गे कोऱ्हाळे बुद्रुक येथे, तर २८ जूनला कठीणपूल मार्गे पणदरे येथे दुपारचा विसावा आणि हनुमानवाडी, माळेगाव मार्गे बारामती येथील शारदा प्रांगणात मुक्काम होईल. २९ जूनला पिंपळी येथे दुपारचा विसावा आणि सणसर मार्गे लासुर्णे येथे रात्रीचा मुक्काम असेल. ३० जूनला लालपुरी, कळंब, निमसाखर मार्गे निरवांगी, तर १ जुलैला अकलूज येथे मुक्काम होईल. २ जुलैला बाबीरपूल, महाळुंग येथे सकाळचा आणि श्रीपूर येथे दुपारचा विसावा तर बोरगाव, माळखांबी मार्गे बोंडले येथे रात्रीचा मुक्काम असेल. ३ जुलैला टप्पा येथे संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानकाका महाराज यांचा ‘बंधू भेट’ सोहळा होऊन रात्रीचा मुक्काम भंडी शेगाव येथे होईल. ४ जुलैला वाखरी येथे ‘उभे रिंगण’ होईल आणि ५ जुलैला पालखी पंढरपूर येथील तांबड्या मारुतीजवळील संत सोपानकाका पालखी मंडपात पोहोचेल. पंढरपूर येथे पाच दिवसांच्या मुक्कामानंतर १० जुलै रोजी दुपारी १ वाजता परतीचा प्रवास सुरू होईल आणि १६ जुलैला पालखी सासवडला परतेल.