Sarfaraz Khan : सर्फराझ खानच्या पोस्टमुळे बीसीसीआयवर प्रश्नचिन्ह, निवड प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात! पाहा VIDEO

Sarfaraz Khan’s Instagram Post : आशिया कप 2025 नंतर भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज विरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. बीसीसीआय या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. युवा कर्णधार शुबमन गिल संघाचे नेतृत्व करणार असून, अनुभवी फिरकीपटू रवींद्र जडेजा याची उपकर्णधारपदी निवड झाली आहे. मात्र, या संघात युवा फलंदाज सर्फराझ खानला स्थान मिळालेले नाही. बीसीसीआयने सर्फराझच्या अनुपस्थितीचे कारण सांगितले असले तरी, त्याच्या ताज्या सोशल मीडिया पोस्टमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
अजित आगरकर यांच्या वक्तव्यावर सर्फराझचे प्रत्युत्तर –
भारतीय संघाच्या निवडीदरम्यान बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांना सर्फराझ खानला संघात न घेण्याबाबत विचारणा झाली. यावर त्यांनी स्पष्ट केले की, सर्फराझ दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. अलीकडेच सर्फराझने स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत अनेक शानदार खेळी केल्या होत्या, त्यामुळे त्याची निवड जवळपास निश्चित मानली जात होती. मात्र, बीसीसीआयच्या या अपडेटमुळे चाहत्यांचा हिरमोड झाला. याच दरम्यान, सर्फराझने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत अजित आगरकर यांच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सर्फराझ खानने इन्स्टाग्राम शेअर केली पोस्ट –
View this post on Instagram
संघ जाहीर झाल्यानंतर काही वेळातच सर्फराझने इन्स्टाग्रामवर दोन व्हिडिओ शेअर केले. या व्हिडीओमध्ये तो फिटनेस टेस्ट देताना दिसत आहे. यापैकी एक व्हिडिओ ‘ब्रोंको टेस्ट’चा असल्याचे मानले जात आहे. या व्हिडीओमध्ये सर्फराझ पूर्णपणे तंदुरुस्त दिसत आहे. त्याच्या या पोस्टमुळे अजित आगरकर यांचे दुखापतीबाबतचे वक्तव्य चर्चेत आले आहे. काही चाहत्यांचा असा दावा आहे की, आगरकर यांनी सर्फराझच्या फिटनेसबाबत चुकीची माहिती दिली. यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही सर्फराझला संघात स्थान मिळाले नव्हते.
हेही वाचा – Ravichandran Ashwin : आर अश्विनने रचला इतिहास! BBL मध्ये सामील होणारा ठरला पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू
सर्फराझने फिटनेसवर केले कठोर परिश्रम –
सर्फराझ खानचा फिटनेस नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी संघातून वगळल्यानंतर त्याने आपल्या फिटनेसवर विशेष लक्ष दिले. अहवालानुसार, त्याने सुमारे 17 किलो वजन कमी करत स्वतःला उत्कृष्ट शारीरिक स्थितीत आणले. त्यानंतर बुच्ची बाबू टूर्नामेंटमध्ये मुंबईकडून खेळताना त्याने अप्रतिम कामगिरी केली. तरीही, या सर्व प्रयत्नांनंतरही त्याला भारतीय संघात पुनरागमन करता आलेले नाही.
हेही वाचा – IND A vs AUS A : शतकापूर्वी केएल राहुलच्या अचानक मैदान सोडण्याने चाहत्यांमध्ये खळबळ! नेमकं कारण काय?
वादाला फुटले तोंड –
सर्फराझच्या ताज्या पोस्टमुळे सोशल मीडियावर बीसीसीआयच्या निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. चाहते आणि क्रिकेट विश्लेषक याबाबत उलटसुलट चर्चा करत आहेत. सर्फराजच्या फिटनेसबाबत बीसीसीआयचे स्पष्टीकरण आणि त्याच्या पोस्टमधील व्हिडीओ यांच्यातील विसंगतीमुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. आता सर्वांचे लक्ष बीसीसीआय आणि सर्फराझच्या पुढील प्रतिक्रियांवर आहे.





