Sarasbaug Controversy : महापौर भाजपच्या की पुणे शहराच्या ? सारसबाग बंदच्या निर्णयावरून काँग्रेस आक्रमक
Sarasbaug Controversy : पुण्यातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा सुनियोजित प्रयत्न असल्याचा आरोप.

Sarasbaug Controversy – सुरक्षेच्या नावाखाली ऐतिहासिक सारसबाग दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय हा केवळ प्रशासनाचा निर्णय नसून पुणेकरांमध्ये भीती आणि संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा सुनियोजित प्रयत्न असल्याचा घणाघात काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते चंदूशेठ कदम यांनी केला. मंजूषा नागपुरे या पुणे शहराच्या महापौर आहेत की भाजपच्या प्रवक्त्या? असा थेट सवाल उपस्थित करत त्यांनी सत्ताधारी भाजप आणि महापालिका प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचे कारण पुढे करून सारसबाग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने एका विशिष्ट समाजाला आणि त्यांच्या सणाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोपही कदम यांनी केला. सोशल मीडियावर फिरणाऱ्या काही भ्रामक आणि अपप्रचार करणाऱ्या व्हिडिओंचा आधार घेत पुण्यात तणावाचे वातावरण असल्याचा खोटा आभास निर्माण केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) आणि महापालिका आयुक्त यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी अधिकृत प्रसिद्धिपत्रक प्रसिद्ध होण्यापूर्वीच महापौरांनी आपल्या वैयक्तिक सोशल मीडिया खात्यावरून याची घोषणा केल्याने महापौर पदावरचे काम सांभाळत आहेत की पक्षाचे, असे कदम यांनी म्हटले आहे.

पुणे महापालिकेकडुन सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातुन दि.२८ आणि २९ रोजी सारसबाग बंद ठेवण्यात आली असुन त्या ठीकानी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
श्रेय घेण्याची घाई कशासाठी…
प्रशासकीय निर्णयांचे श्रेय घेण्यासाठी एवढी घाई कशासाठी? असा सवाल कदम् यांनी केला आहे. घटनात्मक पदावरील व्यक्तीने प्रशासनाच्या निर्णयाचा राजकीय फायद्यासाठी वापर करणे दुर्दैवी असल्याची टीका त्यांनी केली. सारसबाग बंद ठेवण्यामागे दुरुस्ती आणि डागडुजीचे कारण देण्यात येत होते मात्र, सोशल मीडियावर टीकेची झोड उठल्यानंतर अचानक सुरक्षेचे कारण पुढे करण्यात आले.
सत्ताधाऱ्यांची भूमिका दिशाभूल करणारी नसून निर्णयामागील हेतू संशयास्पद असल्याचे कदम यांनी म्हंटले आहे. पुणे हे सामाजिक सलोखा, प्रबोधन आणि पुरोगामी विचारांची परंपरा जपणारे शहर आहे. येथे मुद्दाम भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
प्रशासनाची भूमिकाही संशयास्पद…
सारसबाग हे केवळ पर्यटनस्थळ नाही तर हजारो नागरिकांच्या विरंगुळ्याचे, व्यायामाचे आणि कुटुंबासह वेळ घालवण्याचे प्रमुख ठिकाण आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक आणि नागरिक येथे भेट देत असतात. अशा परिस्थितीत सुरक्षा व्यवस्था वाढवण्याऐवजी थेट बाग बंद करण्याचा निर्णय म्हणजे प्रशासनाने हात टेकल्याचे लक्षण असल्याची टीकाही कदम यांनी केली. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे पुणेकरांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून सत्ताधारी भाजप आणि महापालिका प्रशासनाने या निर्णयामागील नेमकी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही केली आहे.




