सराईत दुचाकी चोराला अटक, 8 वाहने जप्त; आळंदी पोलिसांची कामगिरी

आळंदी – आळंदीसह आसपासच्या परिसरात वाहन चोरी करणाऱ्या सराईताला आळंदी पोलीसांच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून आळंदी, दिघी, तळेगाव दाभाडे, या पोलीस ठाण्यातील पाच गुन्हे उघडकीस आणण्यात आळंदी पोलीसांना यश आले आहे. सराईताकडून 2 लाख 55 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नासीर शमशुद्दीन शेख (वय 36 वर्ष, रा. सोळु, ता. खेड, जि. पुणे, मुळ रा. जिलानाबाद, गुलबर्ग, कर्नाटक) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे तपास पथकातील आर.एम. लोणकर, बी. व्ही. खेडकर हे सोळु परिसरात पेट्रोलिंग करित असताना येथील राॅयल हाॅटेल समोरून नासीर शेख हा चोरीची दुचाकी घेऊन जात होता. यावेळी त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलीसी खाक्या दाखवताच नासीर याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच इतर पाच गुन्ह्याचीही त्याने कबुली दिली आहे. त्याच्याकडून चोरीच्या 8 दुचाकी असा अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 विवेक पाटील, सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल गोडसे, गुन्हे निरीक्षक रमेश पाटील, उपनिरीक्षक रोहन गायकवाड, उपनिरीक्षक जोंधळे, आर. एम. लोणकर, बी. बी. सानप, बी. व्ही. खेडकर, एन. के. साळुंखे, के. सी. गर्जे, जी. व्ही आढे, व्ही. आर. पालवे यांनी केली.





