पुणे जिल्हा | गणेश ज्वेलर्स फोडणारे सराईत गुन्हेगार जेरबंद

वाघोली, (प्रतिनिधी) – वाघोली येथील गणेश ज्वेलर्स चे शटर उचकटुन घरफोडी करणार्या सराईत दोघा गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून दोन दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. हंसराज उर्फ हंसु रनजितसिंग टाक (वय 20, रा. हडपसर, गाडीतळ), सनिसिंग जितेंद्रसिंग जुनी (वय 22, रा. रामटेकडी, हडपसर) अशी या दोघांची नावे आहेत.
गुन्हे शाखा युनिट 6 कडील हवालदार रमेश मेमाणे, पोलीस नाईक नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, शेखर काटे हे हद्दीमध्ये गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना पोलीस नाईक नितीन मुंढे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, 15 जुलै रोजी वाघोली येथे घरफोडीचा गुन्हा घडला होता.
त्यातील आरोपी हंसराज टाक व सनीसिंग जुनी हे भावडी रोडवर भैरवनाथ मंदिराजवळ मोकळ्या मैदानात चोरीचे वाहनांसह थांबलेले आहेत. त्याप्रमाणे जाऊन खात्री केली असता पोलिसांना पाहून ते पळून जाऊ लागले.
त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. या दोघांनी त्यांचे इतर साथिदारांसह इको गाडीसह येऊन वाघोली येथील गणेश ज्वेलर्सचे शटर उचकटुन घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. वरील आरोपींपैकी हंसराज उर्फ हंसु रनजितसिंग टाक हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी एकूण 25 गंभीर गुन्हे दाखल आहेत.





