Sara Arjun : रणवीर सिंगचा चित्रपट ‘धुरंधर’ प्रदर्शित होऊन महिना उलटला असला, तरी चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. या यशाचा फायदा केवळ रणवीर सिंगलाच नाही, तर चित्रपटातील अभिनेत्री सारा अर्जुनलाही झाला आहे. सध्या सारा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली असून, तिने आयएमडीबीच्या ‘मोस्ट पॉप्युलर इंडियन सेलेब्रिटीज’ यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. प्रभास आणि थलपती विजयही मागे आयएमडीबीने जाहीर केलेल्या साप्ताहिक लोकप्रियता यादीत सारा अर्जुनने प्रभास, थलपती विजय आणि अगस्त्य नंदा यांसारख्या मोठ्या स्टार्सना मागे टाकले आहे. विशेष म्हणजे, मागील आठवड्यात सारा दुसऱ्या क्रमांकावर होती, तर या आठवड्यात तिने थेट अव्वल स्थान मिळवले आहे. तिच्या या यशाचे श्रेय मोठ्या प्रमाणात ‘धुरंधर’ चित्रपटाच्या लोकप्रियतेला दिले जात आहे. आयएमडीबीने दिली माहिती आयएमडीबीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले की, ही यादी जगभरातील लाखो चाहत्यांच्या पेज व्ह्यूज आणि युजर एंगेजमेंटच्या आधारावर तयार केली जाते. आयएमडीबीचे हे साप्ताहिक फीचर असून, यात जागतिक पातळीवर ट्रेंड करणाऱ्या भारतीय कलाकारांचा समावेश असतो. ही यादी जगभरातील २ कोटींपेक्षा जास्त चाहत्यांच्या सहभागावर आधारित असते. इतर कलाकारांची क्रमवारी या यादीत सारा अर्जुननंतर दुसऱ्या क्रमांकावर ‘धुरंधर’चे दिग्दर्शक आदित्य धर आहेत. तर थलपती विजय आठव्या, अगस्त्य नंदा बाराव्या, भाग्यश्री बोरसे पंधराव्या, यामी गौतम सतराव्या, प्रभास एकोणिसाव्या आणि तारा सुतारिया चोवीसाव्या क्रमांकावर आहेत. ‘धुरंधर’मधील भूमिकेमुळे सारा अर्जुनची लोकप्रियता झपाट्याने वाढत असून, आता ती भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या कलाकारांपैकी एक ठरली आहे.