Saputara Bus Accident : भाविकांवर काळाचा घाळा; सापुतारा घाटात बसचा भीषण अपघात, सात जणांचा मृत्यू

Saputara Bus Accident – नाशिक-गुजरात हायवेवर सापुतारा घाटात खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला. या अपघाताची तीव्रता सर्वात अधिक असून यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला आहे तर १५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. देवदर्शन करून जात असताना काळ त्यांच्यावर ओढवला. ही दुर्घटना बस २०० फूट दरीत कोसळल्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, हा अपघात पहाटेच्या सुमारास घडला. हा अपघात इतका जास्त भीषण आहे की, अपघातानंतर बसचे दोन तुकडे झाले. नाशिकहून देवदर्शन करून गुजरातच्या दिशेने ही बस निघाली होती. त्यादरम्यानच अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातात मृत्यू झालेला सर्वजण मध्यप्रदेशचे असल्याची माहिती आहे.
उत्तर प्रदेश आणि इतर ठिकाणचे देवदर्शन करून ते अगोदर शिर्डीला पोहोचले. त्यानंतर नाशिक त्र्यंबकेश्वरचे दर्शन करून ते नाशिकहून गुजरातच्या दिशेने निघाले होते. एकूण चार बस होत्या, त्यापैकी एका बसचा अपघात झाला. अपघातानंतर आम्ही लोकांच्या मदतीने जखमींना रूग्णालयात दाखल केले.
या घटनेची माहिती मिळाल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरीतून सर्वांना काढण्यात आले. या बसमध्ये एकूण 40 जण प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जिल्हाधिकारी यांनीही या घटनेनंतर रूग्णालयात धाव घेतली. मात्र, मृतांची नावे कळू शकली नाहीत. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताची चाैकशी पोलिसांकडून सध्या सुरू आहे.





