मुळशीच्या सुपुत्राचा गौरव; संतोष यादव यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार

पौड : कुळे गावचे सुपुत्र व बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागात कार्यरत असलेले संतोष विष्णू यादव यांची क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार २०२५ प्राप्त झाला आहे. वडील विष्णू यादव यांच्या उपस्थित संतोष यांनी पुरस्कार स्विकारला. यामधून एक आदर्श शिक्षक आणि एक आदर्श मुलगा याची सांगड दिसून आली.
संतोष यांचा शैक्षणिक प्रवास अतिशय खडसर राहिला आहे. पुणे, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, दिल्ली अशा वेगवेगळ्या ठिकाणी राहून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी दहावीपर्यंत मामासाहेब मोहोळ माध्यमिक विद्यालय, कुळे येथे शिकले. त्यानंतर आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे येथे उच्च शिक्षण घेतले. पुढे डी.एड. करण्यासाठी मुंबईला गेले आणि २००९ मध्ये मुंबई मनपा शिक्षण विभागात त्यांची शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. शिक्षण क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना मागील वर्षी महापौर पुरस्कारही मिळाला होता.
गेल्या १६ वर्षांच्या अखंड सेवेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह सामाजिक कार्यातही त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे. या कार्याची दखल घेत राज्य सरकारने त्यांना मानाचा पुरस्कार प्रदान केला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ११३ जणांच्या यादीमध्ये संतोष यांचे नाव प्रथम आले आहे.
सदर गुणगौरव पुरस्कार हा सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५ रोजी टाटा थिएटर नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स नरिमन पॉईंट, मुंबई या ठिकाणी मोठ्या दिमाखदार समारंभात पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, मंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री पंकज भोयर, विधान परिषद सदस्य ज.मो.अभ्यंकर, प्रधान सचिव रनजीतसिंग देओल (भा.प्र.से.), आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह (भा.प्र.से.) उपस्थित होते.
कुळे गावाचे नाव राज्यभर झळकले
मुळशी तालुक्यातील कुळे गावाचे नाव राज्यभर झळकले आहे. कुळे ग्रामस्थ, ॲड लहू वारंगे मित्र परिवार, मुळशी विकास प्रतिष्ठान, मुंबई आणि मुळशी एकता प्रतिष्ठान, नवी मुंबई या संस्थांनी संतोष यादव यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


