‘आती क्या रूम पे’ म्हणत तरुणीचा विनयभंग; डॉमिनोज पिझ्झाच्या व्यवस्थापकाला अटक

रायगड- राज्यात महिला अत्याचाऱ्यांच्या घटना अद्यापही कमी होण्याचे नाव घेत नाही आहेत. असे असताना खोपोली मधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील डॉमिनोज पिझ्झाच्या व्यवस्थापकाने सोबत काम करणाऱ्या महिलेला आती क्या रूम पे असे बोलून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.
संतोष यादव असे आरोपी व्यवस्थापकाचे नाव असून खोपोली पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. खोपोलीतील ईन्फीनिटी या इमारतीत तळ मजल्यावर दर्शनी भागात डाँमिनोज पिझ्झाचे दुकान आहे. यादव हा याठिकाणी व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. पीडित महिलाही डाँमिनोज पिझ्झामध्ये काम करीत आहे.
संतोष याने पीडित महिलेला ड्युटी रजिस्टर मागून तिच्या हाताला स्पर्श करून व्यवस्थीत काम करत नाहीस तसेच माझे समाधान देखील करत नाहीस, असे बोलून महिलेच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले. आरोपी एवढ्यावरच न थांबला नसून त्याने तु मेरे साथ मेरे रूम पर चल, मेरे रूम पर कोई नही, तूझे अकेले में बात करनी है. असे सतत बोलुन पीडित महीलेला सतत कामावर असताना हिणवत असे. दरम्यान, महिलेने हा प्रकार आपल्या पतीस सांगितला त्यानंतर हे प्रकरण समोर आले.





