हिंगोली : शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर आपल्या आक्रमक भूमिकेमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या आक्रमक भूमिकेचे अनेक व्हिडिओ यापुर्वी देखील व्हायरल झाले आहेत. सध्या एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला असून यात त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्यालाच दम दिला आहे. विद्यार्थ्यांना शाळेत घेवून जाणाऱ्या ऑटोला आरटीओ अधिकाऱ्याने मोठ्या प्रमाणात दंड ठोठावला. यानंतर दंड ठोठावलेला ऑटोचालक आमदार संतोष बांगर यांच्याकडे गेला व बांगर यांच्याकडे आरटीओ अधिकाऱ्याची तक्रार नोंदवली. यानंतर आमदार संतोष बांगर यांनी आपल्या आक्रमक शैलीत आरटीओ अधिकाऱ्याची शाळा घेतली. आशा प्रकारे दंड ठोठावणार असाल, तर आरटीओ ऑफिसला कुलूप लावून टाकेल, असा सज्जड दम देखील भरला. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांने हा व्हिडियो समाजमाध्यमावर टाकला. त्यामुळे अधिकाऱ्याला झापतानाचा व्हिडिओ चांगला व्हायरल होत आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर प्रकाशझोतात आलेले संतोष बांगर यापूर्वी अनेकवेळा आपली वादग्रस्त विधाने आणि आपल्या भूमिकांमुळे चर्चेत राहीले आहेत. शिंदे गटात सर्वांत शेवटी दाखल झालेले आमदार म्हणजे संतोष बांगर. पण त्यापूर्वी पक्षात बंड झाल्यानंतर आणि एकामोगामाग एक आमदार शिंदे गटात सामील होत असताना संतोष बांगर यांनी जाहीर कार्यक्रमात आपण उद्धव ठाकरे यांची साथ कधीही सोडणार नाही, अशी घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर काही दिवसातच ते शिवसेना शिंदे गटात दाखल झाले होते.