Hingoli Railway Fire: रेल्वे डब्यात अचानक भीषण आग; हिंगोली रेल्वे स्थानकावर एकच खळबळ

हिंगोली : हिंगोली रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या एका रेल्वे डब्याला आज (6 ऑगस्ट) सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत एक डबा पूर्णपणे जळून खाक झाला. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, रेल्वे प्रशासन आणि अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
हिंगोली रेल्वेस्थानकावर गेल्या काही महिन्यांपासून तीन रेल्वे डबे उभे होते. यापैकी एका डब्याला बुधवारी सकाळी अचानक आग लागली. डब्यातून आगीचे लोळ आणि धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग भडकत असल्याने स्थानिक नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
काही मिनिटांत अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र, बंबातील पाणी संपले तरी आग आटोक्यात येत नव्हती. त्यामुळे दुसरा बंब मागवण्यात आला. सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला आग नियंत्रणात आणण्यात यश आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही, परंतु डब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रेल्वे प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली असून, आगीचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. स्थानिक नागरिक आणि रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली होती.





