पिंपरी | संतोष विचारे यांचा राजीनामा, आमदार थोरवे यांना धक्का

खालापूर, (वार्ताहर) – शिवसेना पक्षात मागील अनेक वर्षांपासून काम करणारे आणि सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अत्यंत जवळे मानले जाणारे संतोष विचारे यांनी त्यांचा पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे खालापूर तालुक्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.
शिवसेनेत अनेक वर्ष निष्ठेने काम करणारे संतोष विचारे यांनी पक्ष संघटनेत वेगवेगळी पदे भूषवत पक्ष संघटना मजबूत करण्यात महत्वपूर्ण योगदार दिले. शिवसेना पक्षातील फुटीनंतरही संतोष विचारे हे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या कायम सोबत राहिले.
त्यानंतर आमदार थोरवे यांनी विचारे यांना उत्तर रायगडची संघटक पदाची धुरा दिली होती. ही धूरा सांभाळत असताना आता अचानक विचारे यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने राजकीय वर्तूळात याबद्दल जोरदार चर्चा होत आहे.
आमदार महेंद्र थोरवे यांनी खालापूर तालुक्यात गावभेट दौरा सुरू केला असताना, त्यांच्या दौऱ्यादरम्यान निकटवर्तीय संतोष विचारे यांनी सदस्य पदाचा राजीनामा दिल्याने आमदार थोरवे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आगामी काळात संतोष विचारे कोणता निर्णय घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.





