Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi: नीरा तीर्थी ज्ञानदेवांच्या पादुकांचे शाही स्नान! ‘माऊली.. माऊली’च्या नामघोषात पालखीला पुणे जिल्ह्याचा भावपूर्ण निरोप
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi: लाखो भाविकांच्या उपस्थितीत पुणे व सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना घालण्यात आले पवित्र स्नान.

“नीरा भिवरा पडता दृष्टी,
स्नान करिता शुद्ध सृष्टी,
अंती तो वैकुंठप्राप्ती,
ऐसे परमेष्ठी बोलिला ।।
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi – या संतवचनांचा प्रत्यय बुधवारी (दि.१५) नीरा नगरीत आला. टाळ-मृदंगाच्या अखंड गजरात, “माऊली..माऊली”च्या निनादाने आसमंत दुमदुमून गेला आणि नीरा नदीच्या पवित्र तीर्थात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे शाही स्नान मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाले. या दिव्य सोहळ्यानंतर माऊलींची पालखी पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन पालखी सोहळ्याचे प्रणेते हैबतबाबांच्या जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्कामाकडे मार्गस्थ झाली.
बुधवारी पहाटेच वाल्हेनगरीचा निरोप घेत माऊलींचा पालखी सोहळ्याने लोणंदच्या दिशेने प्रस्थान केले. सकाळी आठ वाजता पिंपरे (खुर्द) येथील अहिल्याबाई होळकर विहिरीसमोर न्याहरीसाठी विसावा घेण्यात आला. पिंपरे आणि पिसुर्टी ग्रामस्थांनी वारकऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यानंतर पालखी सोहळा दुपारच्या भोजनासाठी नीरा नगरीत दाखल झाला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, माजी सभापती दत्ताजी चव्हाण, विराज काकडे ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी फुलांच्या वर्षावात माऊलींचे स्वागत केले. ग्रामपंचायतीने पालखी तळाची आकर्षक फुलांनी सजावट केली होती. हजारो भाविकांनी शिस्तबद्ध रांगा लावत माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले आणि भक्तीच्या महासागरात स्वतःला अर्पण केले.
नीरा स्नानाचा दिव्य सोहळा
माऊलींच्या पालखी सोहळ्यातील नीरा स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पालखी प्रवासाचा अर्धा टप्पा पूर्ण झाल्यानंतर पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील नीरा नदीच्या प्रसिद्ध दत्तघाटावर ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे स्नान घालण्याची परंपरा शतकानुशतके अखंड सुरू आहे. बुधावारी दुपारचे भोजन आणि विसावा झाल्यानंतर सोहळा दत्तघाटाकडे मार्गस्थ झाला. नीरा नदीवरील शंभर वर्षांचा इतिहास साक्षीदार असलेल्या ब्रिटिशकालीन पुलावरून पालखीचा वैभवी लवाजमा पुढे सरकत होता.
सर्वात पुढे तुतारीचा मंगल नाद, त्यामागे मानाचे अश्व, भगव्या पताका, विणेकरी वारकरी आणि फुलांनी सजलेला माऊलींचा रथ.. मंद वाऱ्याच्या साक्षीने हा अविस्मरणीय देखावा भक्तांच्या डोळ्यांत साठून राहिला. पैलतीरावर सोहळ्याचे मालक, विश्वस्त आणि मानकरी यांच्या उपस्थितीत दत्तघाटावर ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना पवित्र तीर्थात शाही स्नान घालण्यात आले. हा दैवी क्षण अनुभवण्यासाठी दत्तघाट आणि नदीचा संपूर्ण परिसर भाविकांनी अक्षरशः फुलून गेला होता.
पुणे जिल्ह्याचा भावपूर्ण निरोप
पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विरधवल जगदाळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. शिवमकुमार, प्रांताधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, जेजुरीचे पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील, बांधकाम सभापती दीपाली हुलावळे, विजय शिंदे, आरोग्य उपसंचालक भगवान पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी माऊलींच्या पालखीला पुणे जिल्ह्याच्या वतीने भावपूर्ण निरोप दिला.





