Satara : सातारा पालिकेचा उद्यापासून संक्रांत महोत्सव

सातारा : केंद्रशासन पुरस्कृत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टीने सातारा पालिकेच्यावतीने ‘सोनचिरैया संक्रांत महोत्सव 2025’चे आयोजन शुक्रवार, दि. 10 ते रविवार, दि. 12 या कालावधीत करण्यात आले आहे. या महोत्सवाला नागरिकांनी भरघोस प्रतिसाद द्यावा. बचत गटांची उत्पादने खरेदी करून, महिला उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केले आहे.
राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाची अंमलबजावणी सातारा पालिकेच्यावतीने केली जात आहे. बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालासाठी सोनचिरैया हा देशव्यापी ब्रँड तयार करण्यात आला आहे. या अभियानांतर्गत सातारा शहरात अभियान व्यवस्थापक कीर्ती साळुंखे व समुदाय संघटक आरती जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली 1100 बचत गट व 34 वस्ती स्तर संघांची निर्मिती करण्यात आली आहे. महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी स्वयंरोजगार व कौशल्य प्रशिक्षणांतर्गत गीतांजली यादव यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले जात आहे.
बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला शाश्वत बाजारपेठ मिळावी यासाठी सातारा शहर स्तर संघामार्फत सोनचिरैया शहर उपजीविका केंद्र मोती तळ्याशेजारी सुरू करण्यात आले आहे. बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टीने आणि संक्रांतीचे औचित्य साधून, दि. 10 ते दि. 12 या कालावधीत शाहू कलामंदिरच्या प्रांगणात सोनचिरैया संक्रांत महोत्सव होत आहे.
संक्रांतीसाठी लागणारे सर्व साहित्य या महोत्सवात उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये तिळगुळ, वाण वाटपाच्या वस्तू, गुळाच्या पोळ्या, इन्स्टंट पिठे, शोभेच्या वस्तू, सुगड, साड्या, परकर, गोधड्या, आयुर्वेदिक सौंदर्यप्रसाधने, कपडे, हँडमेड ज्वेलरी, इमिटेशन ज्वेलरी, मातीची भांडी, विविध मसाले, आकर्षक मेंदी काढण्यासाठी स्टॉल आणि खवय्यांसाठी खाऊगल्ली यांचा समावेश आहे. या महोत्सवात 75 स्टॉल लावण्यात येणार आहेत.





