Sanju Samson Dropped : भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; टी-२० वर्ल्ड कपच्या ‘हिरोला’ संघातून डच्चू
Sanju Samson Dropped : बीसीसीआयने या आगामी टी-२० मालिकेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघ निवडीमध्ये निवडकर्त्यांनी अनेक धक्कादायक आणि धाडसी निर्णय घेतले आहेत.

India T20I Squad Announce For Zimbabwe Tour 2026 Sanju Samson Dropped : इग्लंड दौऱ्यानंतर भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाणार असून, तिथे तीन सामन्यांची टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. बीसीसीआयने या आगामी टी-२० मालिकेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघ निवडीमध्ये निवडकर्त्यांनी अनेक धक्कादायक आणि धाडसी निर्णय घेतले आहेत. सर्वात मोठी बातमी म्हणजे, स्टार यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसनला संघातून थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तसेच, गोलंदाजीत अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
चार नव्या दमाच्या खेळाडूंची संघात एन्ट्री –
झिम्बाब्वेविरुद्धच्या या मालिकेसाठी निवडकर्त्यांनी युवा खेळाडूंवर मोठा विश्वास दाखवला आहे. आयपीएल २०२६ मध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने प्रभावित करणाऱ्या प्रभसिमरन सिंगला संघात स्थान मिळाले आहे. प्रभसिमरनने १४ सामन्यांत तब्बल ५१० धावा कुटल्या होत्या. तसेच, आयपीएल २०२६ मध्ये आपल्या अफाट वेगाने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा वेगवान गोलंदाज अशोक शर्मा याला पहिल्यांदाच भारतीय संघात बोलावणे आले आहे. अशोकने ताशी १५४.२ किमी वेगाने चेंडू फेकून खळबळ उडवली होती. त्यांच्यासोबतच यश ठाकूर आणि ऑलराउंडर हर्ष दुबे या नव्या चेहऱ्यांचे नशीब चमकले असून, मयंक यादवने दुखापतीनंतर संघात पुनरागमन केले आहे.
संजू सॅमसनच्या हकालपट्टीने चाहते संतप्त –
नुकत्याच संपलेल्या टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये ‘प्लेअर ऑफ द सिरीज’चा मान मिळवून भारताला जगज्जेते बनवणाऱ्या संजू सॅमसनला अशा प्रकारे संघातून ड्रॉप केल्यामुळे क्रिकेट वर्तुळात तीव्र आश्चर्य व्यक्त होत आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यातही त्याला बाहेर बसवून १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला संधी देण्यात आली होती. संजूच्या जागी आता प्रभसिमरन आणि इशान किशनकडे यष्टिरक्षणाची धुरा असेल.
झिम्बाब्वे मालिकेचे वेळापत्रक: मालिकेतील तिन्ही सामने हरारे (Harare) मैदानावर खेळवले जातील. पहिला सामना २३ जुलै, दुसरा सामना २५ जुलै आणि तिसरा निर्णायक सामना २६ जुलै रोजी पार पडणार आहे.
झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ:
श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, इशान किशन, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा, मयंक यादव, प्रभसिमरन सिंग.





