Sanju Samson : संजू सॅमसनचा आशिया कप 2025 पूर्वी मोठा निर्णय! ‘या’ कौतुकास्पद निर्णयाने जिंकली चाहत्यांची मनं

Sanju Samson Donates KCL Salary : भारतीय संघाचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसन आता एसीसी आशिया कप 2025 साठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वी सरावादरम्यान संजू दुखापतग्रस्त झाला होता, परंतु आता तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. यामुळेच तो यष्टीरक्षणाचा सराव करतानाही दिसत आहे. आशिया कप 2025 च्या आधी संजूने एक मोठा निर्णय जाहीर केला आहे, ज्यामुळे चाहत्यांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे
संजू सॅमसनने घेतला मोठा निर्णय –
केरळ क्रिकेट लीगमध्ये कोच्ची ब्लू टायगर्सने संजू सॅमसनला 26.8 लाख रुपयांना विकत घेतले होते. फ्रँचायझीने आपला अर्ध्याहून अधिक खर्च संजूवर केला होता. तरीही, 7 सप्टेंबर 2025 रोजी कोच्ची ब्लू टायगर्सने विजेतेपद पटकावले. या विजयावेळी संजूचे मोठे भाऊ सॅली सॅमसन संघाचे कर्णधार होते.
Sanju Samson has confirmed that the auction money he received will be gifted to players & coaches of Kochi Blue Tigers after the KCL victory. ❤️
– Sanju is winning the heart of everyone. pic.twitter.com/e91KtIxwez
— Johns. (@CricCrazyJohns) September 8, 2025
संजू त्या वेळी आशिया कप 2025 मुळे दुबईत असल्याने उपस्थित नव्हता. मात्र, विजयानंतर प्रतिक्रिया देताना संजूने जाहीर केले की, त्याला लिलावात मिळालेली संपूर्ण रक्कम तो कोच्ची ब्लू टायगर्सच्या इतर खेळाडू आणि प्रशिक्षक कर्मचार्यांमध्ये वाटणार आहे. या निर्णयामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या हंगामात संजूने फलंदाजीने गाजवला मैदान –
स्टार यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसनने कोच्ची ब्लू टायगर्ससाठी 6 सामन्यांतील 5 डावांमध्ये 73.60 च्या सरासरीने 368 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट 186.80 असा राहिला. संजूने या स्पर्धेत 24 चौकार आणि 30 उत्तुंग षटकार ठोकले. तसेच, त्याने एक शतक आणि तीन अर्धशतकेही झळकावली. आता आशिया कप 2025 मध्येही हा फॉर्म कायम ठेवण्याचे दडपण संजूवर असेल. विशेषतः पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात संघातील स्थान पक्के करण्यासाठी त्याला अप्रतिम कामगिरी करावी लागेल.





