Sanju Samson Reaction : ‘माणूस आहे, मनात तर येतचं ना!’ सॅमसनचं रोखठोक उत्तर; चाहत्यांच्या मनातील प्रश्नावर दिलं मनमोकळं स्पष्टीकरण
Sanju Samson Reaction : संजू तीन वेळा (९७*, ८९ आणि ८९) शतकापासून थोडक्यात वंचित राहिला, याबाबत चाहत्यांच्या मनात असलेली खंत संजूने स्वतःच्या उत्तराने दूर केली आहे.

Sanju Samson Reaction on Missing Centuries in T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारताच्या विजयाचा सर्वात मोठा नायक ठरलेल्या संजू सॅमसनने आपल्या शतकांबाबत सुरू असलेल्या चर्चेवर अखेर भाष्य केले आहे. या स्पर्धेत सलामीवीर म्हणून संजूने ५ डावांत ३२१ धावा कुटल्या आणि ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’चा मान मिळवला. मात्र, संजू तीन वेळा (९७*, ८९ आणि ८९) शतकापासून थोडक्यात वंचित राहिला, याबाबत चाहत्यांच्या मनात असलेली खंत संजूने स्वतःच्या उत्तराने दूर केली आहे.
“माणूस आहे, मनात येतच…”
‘इंडिया टुडे’शी बोलताना संजू म्हणाला, “मी असं अजिबात म्हणणार नाही की मी शतकाबद्दल विचार केला नाही. एक माणूस म्हणून मनात येतंच की, अरे यार एखादं शतक झालं तर मजा येईल. पण लगेच मी स्वतःला विचारलं, संजू तुझ्या या धावा आत्तापर्यंत कशा बनल्यात? जेव्हा तू खेळायला सुरुवात केली होतीस, तेव्हा तर शतकाचा विचार नव्हता केला. लोक म्हणत आहेत की मी तीन शतकं गमावली, पण मला वाटतं की मी त्याहून मोठं काम केलं आहे. मी माझ्या योगदानावर खूप खूश आहे.”
गौतम गंभीरचा ‘नो पर्सनल माईलस्टोन’ मंत्र –
View this post on Instagram
संजूने आपल्या या यशाचे श्रेय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या विचारसरणीला दिले आहे. संजूने सांगितले की, “गंभीर भाई आणि सूर्याने श्रीलंका मालिकेपासूनच हे स्पष्ट केले होते की, संघात वैयक्तिक विक्रमांसाठी जागा नाही. आमची धावसंख्या ८० असो किंवा ९०, त्या क्षणी संघाला काय हवंय हे पाहणं आमचं कर्तव्य आहे. आम्ही तीच रणनीती अवलंबली आणि त्यामुळेच आज आम्ही विश्वविजेते आहोत.”
संघाच्या विजयासमोर वैयक्तिक शतकाची किंमत काहीच नसते, हा संदेश ३१ वर्षीय संजू सॅमसनने आपल्या या बॅटिंगने दिला आहे.





