लखनौ : उत्तरप्रदेशातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचा आरोप आपचे नेते संजय सिंह यांनी मंगळवारी केला. उदाहरणादाखल त्यांनी एका घराच्या पत्त्यावर ४ हजारहून अधिक मतदारांची नोंदणी असल्याचाही दावा केला. सिंह यांनी लखनौमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी भाजप आणि निवडणूक आयोगाच्या संगनमतातून उत्तरप्रदेशात मतचोरी सुरू झाल्याचा आरोप केला. महोबा जिल्ह्यातील २ घरांचा उल्लेख मी सोमवारीच केला. एका घरात २४३, तर दुसऱ्या घरात १८५ मतदार आढळले. आता आणखी एक प्रकरण समोर आले. महोबामधल्याच एका घराच्या पत्त्याच्या आधारे तब्बल ४ हजार २७१ मतदारांची नोंद झाली. एका घरात ४ हजार मतं असतील; तर संबंधित कुटूंबातील सदस्यांची संख्या साधारणपणे १२ हजार असायला हवी. तेवढ्या मोठ्या कुटूंबाचा शोध घ्यायला हवा. ते घर ज्या गावात आहे; त्या गावात सुमारे १६ हजार मतदार आहेत. त्यामुळे त्या घरात मोठ्या संख्येने असणाऱ्या मतदारांची बाब आणखी गंभीर मानायला हवी. संबंधित घराच्या प्रमुखाने सरपंच पदाची निवडणूक लढवावी. केवळ कुटूंबातील सदस्यांच्या जोरावर तो निवडून येईल, अशी उपरोधिक टिप्पणीही त्यांनी केली.