Sanjay Raut : ओमराजेंनी ठाकरेंची साथ का सोडली? संजय राऊतांचा भरसभेत खळबळजनक आरोप
Sanjay Raut : उद्धव ठाकरे यांच्या 'उबाठा' पक्षाचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Sanjay Raut : उद्धव ठाकरे यांच्या ‘उबाठा’ पक्षाचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विदर्भापासून आपल्या दौऱ्याची सुरुवात केली असून, आज धाराशिव येथे त्यांची जाहीर सभा पार पडली.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याच मतदारसंघात झालेल्या या सभेपूर्वी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक आणि घणाघाती शैलीत भाषण केले. या भाषणात संजय राऊत यांनी ओमराजे निंबाळकर पक्ष सोडून का पळाले, याचे कारण थेट जाहीर सभेत उघड करत अनेक सनसनाटी आणि गंभीर आरोप केले.
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ओमराजेंच्या जुन्या भाषणांची आठवण करून देत त्यांच्यावर ‘भामटा’ आणि ‘सोंगाड्या’ अशी बोचरी टीका केली. ते म्हणाले की, हा माणूस पूर्वी प्रत्येक भाषणात आवर्जून सांगायचा की, २००६ साली तो साधा ग्रामपंचायत सदस्यही नव्हता, पण उद्धव ठाकरेंनी त्याला एकदा आमदार आणि दोनदा खासदार केले.
अशा स्थितीत आपण उद्धव ठाकरेंना कधीही सोडणार नाही, अशी शपथ घेणारा हा भामटा आता स्वतःच पक्ष सोडून पळाला आहे. आपण तब्बल २० वर्षे एका सापाला दूध पाजले होते आणि आता वेळ आली आहे की या सापाचा फणा जाहीरपणे ठेचलाच पाहिजे, असा आक्रमक पवित्रा राऊत यांनी घेतला.
ओमराजे निंबाळकर यांनी ‘विकासासाठी’ सत्ताधारी गटात जात असल्याचा दावा केला होता, त्याचाही संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. या खासदाराने धाराशिवचे काय दुबई किंवा सिंगापूर केले आहे का, असा सवाल करत राऊत यांनी त्यांच्या कथित घोटाळ्याचा पाढा वाचला.
ओमराजेंनी आपल्या वडिलांच्या नावाने ‘पवनराजे मल्टी स्टेट’ ही कंपनी उभी केली असून याच कंपनीच्या माध्यमातून संपूर्ण धाराशिवमध्ये तब्बल ५०० कोटी रुपयांचे प्लॉट खरेदी करण्यात आले आहेत. गरिबांच्या नावाने बोगस खाती तयार करून पैशांची हेराफेरी करण्यात आली, तसेच तेरणातील भंगार विकून पैसे खाल्ले गेले. या सर्व आर्थिक गैरव्यवहारामुळे त्यांच्या मागे ‘ईडी’ची (सक्तवसुली संचालनालय) चौकशी लागली होती आणि याच चौकशीला घाबरून हा डरपोक सोंगाड्या पक्ष सोडून पळाला, असा थेट आरोप राऊत यांनी केला.
यासोबतच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अत्यंत खळबळजनक वक्तव्य करत ओमराजेंच्या वडिलांच्या (पवनराजे निंबाळकर) खुनाचाही उल्लेख केला. ओमराजेंच्या वडिलांचा जो खून झाला होता, त्यामागे देखील मोठा संशय असल्याचे आता म्हटले जात आहे, असा संशयाचा बाण राऊत यांनी सोडला.
पुढे बोलताना त्यांनी ७ मे २०२४ रोजी भूम तालुक्यातील पाटसांगवी गावात मतदान केंद्राबाहेर झालेल्या समाधान पाटील या शिवसैनिकाच्या हत्येचा संदर्भ दिला. ही हत्या शिंदे गटाच्या लोकांनी केली होती असा आरोप करत राऊत म्हणाले की, ज्याने शिवसेनेसाठी आपले बलिदान दिले, त्या समाधान पाटील यांना गद्दारी करताना याने विचारले होते का, त्यांची परवानगी घेतली होती का? आज हा गद्दार थेट त्याच हत्या करणाऱ्यांच्या गोटात जाऊन बसला आहे.
भाषणाचा शेवट करताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उमरगा येथील शिवसैनिकांच्या निष्ठेची आठवण करून दिली. तिथल्या शिवसैनिकांनी ओमराजेंना एक भावनिक पत्र लिहून सांगितले होते की, आम्ही आमच्या किडन्या विकतो आणि तुला पैसे देतो, पण तू शिवसेनेशी गद्दारी करू नकोस. एवढी टोकाची निष्ठा असतानाही हा माणूस केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी निघून गेला.
तू स्वतःच्या हिमतीवर नाही तर निष्ठावंत शिवसैनिकांच्या जिवावर आणि रक्तावर खासदार झाला आहेस, अशी सणसणीत चपराक मारत राऊत यांनी आगामी काळात धाराशिवची जनता या गद्दारीचा हिशोब नक्कीच चुकता करेल, असा इशारा दिला.






