Sanjay Raut : ठाकरे हाच ब्रँड.! ५ जुलैचा एकत्रीत मोर्चा आता निघणार नाही; संजय राऊतांची पोस्ट चर्चेत

Sanjay Raut : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला गेल्या काही दिवसांपासून तीव्र विरोध होत होता. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन्ही शासन निर्णय (जीआर) रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
तसेच, या विषयावर सविस्तर अभ्यास करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात येणार असून, या समितीच्या अहवालानंतरच पुढील धोरण ठरवले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
दरम्यान, आता उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ‘५ जुलैचा एकत्रीत मोर्चा आता निघणार नाही..’ असं जाहीर केलं आहे. ‘हिंदी विरुद्ध मराठी’ असा मोठा वाद उफाळून आला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, येत्या ५ जुलैला मुंबईत भव्य मोर्चाचे आयोजन केले होते.
मात्र, आता हा मोर्चा रद्द करण्यात आला आहे. हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द! हा मराठी एकजुटीचा विजय, ठाकरे एकत्र येणार याचा धसका, ५ जुलैचा एकत्रीत मोर्चा आता निघणार नाही. पण.. ठाकरे हाच ब्रँड! (फडणवीस यांनी घेतलेला शहाणपणाचा निर्णय.छान)” या आशयाची पोस्ट राऊत यांनी शेअर केली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा..
हिंदी भाषा शिकवण्याच्या निर्णयावर विचारमंथन करण्यासाठी मंत्रिमंडळाची विशेष बैठक आज पार पडली. या बैठकीत सखोल चर्चा झाल्यानंतर त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी भाषेचा समावेश करण्याबाबतचे १६ एप्रिल २०२५ आणि १७ जून २०२५ चे शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती देताना सांगितले की, या निर्णयामुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा विचार करून हे पाऊल उचलण्यात आले आहे.





