Sanjay Raut । Uddhav Thackeray | Ambadas Danve – मुख्यमंत्री पदावरून भांडणाऱ्या महाविकास आघाडीला पराभव स्वीकारावा लागला. तीनही महत्वाचे पक्ष मिळून त्यांना ५० जागांवर विजय देखील मिळविता आला नाही. पराभूत उमेदवारांची मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली, यावेळी बहुतांश जणांनी स्वबळावर पुढे जाण्याचा सूर आळवला. त्यामुळे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का, यावर चर्चाना सुरुवात झाली आहे. या चर्चाना विधान परिषदेतील उपनेते असलेल्या अंबादास दानवे यांनी देखील दुजोरा दिला आहे.
दानवे म्हणाले, पक्षात अनेकांचा स्वबळावर लढावे असे म्हणणे आहे, जे आम्ही आजिबात नाकारत नाही. शिवसेनेने स्वतंत्रपणे लढायला हवे, असे बऱ्याच जणांना वाटते. शिवसेना काही सत्तेसाठी जन्माला आली नाही. आज ना उद्या सत्ता मिळेलच, मात्र शिवसेना ही एका विचाराने काम करणारी संघटना आहे. त्यामुळे सगळ्याच निवडणुकांमध्ये स्वतंत्र संघटनांची निर्मिती करून निवडणूक लढली पाहिजे, असे दानवेंनी सांगितले.
दरम्यान, दानवेंच्या या विधानंतर आता खासदार संजय राऊत यांनी सविस्तर भूमिका व्यक्त केली आहे. माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, ‘पराभव होताच मविआमधून बाहेर पडण्याचा काही जणांनी सूर आळवला असला तरी ही निवडक कार्यकर्त्यांची भावना आहे. पक्षाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही’, असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, शिवसेना (ठाकरे) महाविकास आघाडीपासून वेगळी होणार नाही. निकाल लागल्यानंतर तीनही पक्षांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तीनही पक्ष आपापल्यापरिने निकालाचे विश्लेषण, चिंतन करत आहेत. या पराभवाची कारणे शोधण्याचे काम सुरू आहे.
ही कारणे ईव्हीएमच्या दिशेने जात असून तीनही पक्षांना एकत्र बसून चर्चा करावी लागेल. पराभव झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांची निश्चित अशी भावना असते की आपण स्वबळावर लढायला हवे होते. पण आगामी काळात मुंबई मनपा आणि राज्यातील १४ महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्याचाही निर्णय घ्यावा लागणार आहे.’ असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.
यंदा विरोधी पक्षनेतेपद रिक्त :
विधानसभा निवडणुकीत मविआला केवळ ४६ जागा मिळाल्या. शिवसेनेने (उबाठा) २०, काँग्रेसने १६, राष्ट्रवादीने (शप) १० जागा जिंकल्या. मविआतील कुणालाच विरोधी पक्षनेतेपद मिळेल एवढ्या जागा मिळालेल्या नाहीत. विरोधी पक्षासाठी विधानसभेत किमान २९ सदस्य असावे लागतात. त्यापासून तिन्ही पक्ष दूर आहेत.