Sanjay Raut : पंजाब सरकारचे कार्य बघा; संजय राऊतांनी फडणवीसांना दिला खोचक सल्ला

मुंबई : राज्यातील मराठवाड्याला अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. पण मराठवाड्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीवरून राजकारण सुरू झाले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तर या मदतीच्या विषयावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खोचक सल्ला दिला आहे. पंजाब सरकारचे कार्य बघा, असे म्हणत राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत यांनी शनिवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधत म्हटले की, काही झाले की 1950 सालाचे काढायचे. 1940 सालाचे काढायचे. अरे तुम्ही तुमचे बोला. तुम्ही शेण खात आहात ते बोला. आता तुम्ही शेण खात आहात. आता तुमच्यावर जबाबदारी आहे. मिस्टर फडणवीस तुम्ही पंजाब सरकारकडे पाहा.
पंजाब सरकारचे कार्य बघा. त्यांनी पन्नास हजार हेक्टरी शेतकऱ्यांना दिलेले आहेत. त्यांनी वाहून गेलेले प्रत्येक घर बांधून देण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी योजना आणलेली आहे. पण तुम्ही काय करत आहात, तर चार वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे होते. त्याआधी शरद पवार होते. त्याआधी वसंतराव नाईक होते. त्याआधी यशवंतराव चव्हाण होते, असे म्हणत हे 1948 सालापर्यंत जातील, असा खोचक टोला राऊतांनी लगावला आहे.
तसेच, देवेंद्र फडणवीस राज्य करण्याची ही पद्धत नाही, असे म्हणत राऊतांनी फडणवीसांना आधी राज्य करायला शिका, असा सल्ला दिला आहे. प्रशासन चालवायला शिका. प्रशासन म्हणजे सुडाचे राजकारण नाही. तुम्हाला ट्रेनिंगची गरज आहे. तुमचे ट्रेनिंग घ्यायचे असेल तर सांगा. आम्ही योग्य माणसे पाठवू किंवा आम्हीच तुम्हाला ट्रेनिंग देऊ. तुम्ही वर्तमान काळाचे बोला. भूतकाळ कशाला उकरून काढत आहात, असे म्हणत त्यांनी फडणवीस यांच्यावर पलटवार केला.





