“पंतप्रधान मोदींवर बोलण्याची संजय राऊत यांची लायकी नाही”; चित्रा वाघ यांची संजय राऊत यांच्यावर टीका

मुंबई : पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांनी घाम आणि पैसा गाळूनदेखील कर्नाटकमध्ये भाजपाचा दारुण पराभव होईल आणि हा २०२४ या वर्षासाठी शुभशकुन असेल, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. या टीकेला आता भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पंतप्रधान मोदी त्यांच्यावर बोलण्याची संजय राऊत यांची लायकी नाही, असे म्हणत संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यात त्यांनी,“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, काश्मीरमधील कलम ३७० हटवण्यासाठी, राम मंदिर बनवण्यासाठी, देशभर चांगले रस्ते निर्माण करण्यासाठी, पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आणि परदेशात भारताचा लौकिक वाढविण्यासाठी घाम गाळला आहे. तर सर्वज्ञानी संजय राऊत यांनी पत्राचाळमध्ये भ्रष्टाचार करण्यासाठी, मराठी माणसाला लुटण्यासाठी, बेकायदा जमिनी खरेदी करण्यासाठी, कोविडमध्ये कंत्राटं घेऊन कमावण्यासाठी, गैरमार्गानं आलेले २५ लाख भरण्यासाठी घाम गाळला आहे, हे सर्व देशवासियांना माहिती आहे”, असे म्हणत चित्रा वाघ यांनी राऊतांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
पुढे त्यांनी, “पंतप्रधान मोदी गरिबांचं कल्याण करण्यासाठी आणि देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी घाम गाळत आहेत. त्यामुळे पंतप्रधानांवर बोलण्याची संजय राऊतांची लायकी नाही”, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, आज संजय राऊतांनी कर्नाटक निवडणुकीवरून पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली होती. “आज कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक होत असून या निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांनी घाम आणि पैसा गाळूनदेखील भाजपाचा दारुण पराभव होईल आणि हा २०२४ साठी शुभशकुन असेल”, असं संजय राऊत म्हणाले होते. त्यांच्या याच टीकेवर चित्रा वाघ यांनी उत्तर दिले आहे.





