Sanjay Raut | Gulabrao Patil | जळगाव येथे माध्यमांशी बोलताना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उबाठा गटाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. संजय राऊत पांढऱ्या पायाचा माणूस आहे, ते जिथं जातील तिथं सगळं संपत असल्याचे पाटील म्हणाले. विधानसभा निवडणुकीत जे त्यांच्या आजूबाजूला होते, ते सुद्धा यांच्यावर नाराज आहेत. यांच्याकडे कुणीही बघायला तयार नाही. ते जसे आले तसेच महानगरपालिकेच्या निवडणुकीत माघारी जातील, असे विधान गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केले. विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील शिंदे गटाचे पाच आमदार पाडण्याचे आव्हान देत संजय राऊत हे जळगावमध्ये आले होते. मात्र, त्यांना उमेदवार सुद्धा मिळाला नाही. यामुळे आता महापालिका निवडणुकीत आता ते काय करतील असा प्रश्न आहे. आगे आगे देखो होता है क्या असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत एकप्रकारचा अल्टिमेटम दिला आहे. तसेच वेळ काही लांब नाही असे देखील ते यावेळी बोलताना म्हणाले. चर्चेत असलेल्या विधानावर गुलाबराव पाटील म्हणाले…. नुकतेच राज्याच्या राजकारणात दोन मंत्र्यांनी केलेल्या विधानावर वादंग निर्माण झाला आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कृषी क्षेत्राविषयी केलेले विधान आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदी भाषेबद्दल व्यक्त केलेले मत, यावरून दोन्ही मंत्र्यावर टीका करण्यात येत आहे. सरनाईक यांनी त्यांचा विचार मांडला असेल असे गुलाबराव पाटील म्हणाले. तर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी बोलण्यास नकार दिला. याबाबत मला काही माहित नसल्याचे ते म्हणाले.