मुंबई : भारतीय शेअर मार्केटमध्ये एक खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. अमेरिकेच्या जिल्हा न्यायालय आणि सेक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने गौतम अदानी आणि अन्य अधिकाऱ्यांवर लाचखोरी आणि फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत.
या आरोपांमुळे अदानी उद्योग समूहाच्या मालकीच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स गडगडले आहेत. अदानी उद्योग समूहाच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स १० ते २० टक्क्यांनी घसरले आहेत. या सगळ्यांवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
256 दशलक्ष डॉलर्सची लाच दिल्याप्रकरणी ट्रम्प सरकारने अटक वॉरंट जारी केले आहे. धारावी प्रकल्प प्रकरणात अदानींनी हस्तक्षेप केला आहे. टेंडरमध्येही अनियमितता आहे. यामुळे गौतम अदानींमुळे आता संपूर्ण भारताची बदनामी होत आहे असे संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच महाराष्ट्र निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभूत करण्यासाठी अदानींनी 2000 कोटी रुपये खर्च केले, असा धक्कादायक आरोपदेखील संजय राऊत यांनी केला आहे.
गौतम अदानींवर नेमका काय आहे आरोप?
भारतातील सर्वांत मोठा सौरउर्जी निर्मिती प्रकल्पाचे कंत्राट मिळावे यासाठी गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांनी भारतीय अधिकाऱ्यांना सुमारे 250 दशलक्ष डॉलर्स देण्याचे मान्य केले होते. या प्रकल्पातून पुढच्या 20 वर्षांत साधारण 2 अब्ज डॉलर्सचा नफा मिळणार होता.
तसेच कर्जदार आणि गुंतवणूकदार यांच्यापासून हा भ्रष्टाचार लपवून गौतम अदानी आणि अदानी ग्रीन एनर्जीचे सीईओ विनीत जैन यांनी 3 अब्ज डॉलर्सचे बॉण्ड्स आणि रोखे जमा केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.