Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांना कुलदैवत मानावं अन् गावागावात ‘जत्रा’ भरवावी, संजय राऊतांची जहरी टीका

मुंबई : महायुतीच्या तिरंगा यात्रेवरून शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. “तिरंगा यात्रा म्हणजे अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या युद्धविरामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न आहे. जर डोनाल्ड ट्रम्पमुळे युद्ध थांबले असेल, तर फडणवीसांनी त्यांना कुलदैवत मानावं आणि गावागावात ‘डोनाल्ड जत्रा’ भरवावी,” असे तडाखेबाज विधान संजय राऊत यांनी केलं आहे.
तसेच, आता टेंभी नाक्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा बसवा आणि वरती अमेरिकेचा झेंडा लावा, असं म्हणत संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले की, तिरंगा यात्रा काढण्याचे कारण काय? कसलं श्रेय? शस्त्रसंधीचं आणि माघारीचं श्रेय का? युद्धविराम, माघार, शस्त्रसंधी हाच विजय मानून एक पक्ष एका देशामध्ये विजय सोहळा साजरा करतो. युद्धविराम ट्रम्प यांच्या माध्यमातून झाला, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, जेपी नड्डा यांनी अमेरिकेचा झेंडा हातात घेऊन डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे. गावागावात डोनाल्ड जत्रा भरवावी आणि त्यांनी सांगा आमचं कुलदैवत डोनाल्ड आहे, अशी खरमरीत टीका संजय राऊत यांनी केली आहे.
दरम्यान, ऑपरेशन सिंदूरबाबत मीडिया ब्रीफिंगमध्ये सहभागी असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल भाजप मंत्री कुंवर विजय शाह यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिल्यानंतर, “हा देशद्रोह आहे, त्यांना अटक केली पाहिजे,” अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केली आहे.



