Maharashtra Politics : अलीकडेच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने मोठं यश मिळवत राज्यात क्रमांक एकचा पक्ष म्हणून आपली ताकद सिद्ध केली, तर शिवसेना शिंदे गट राज्यात दुसऱ्या क्रमांकावर राहिला. अनेक महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती पाहायला मिळाली. मुंबई महापालिकेतही भाजप-शिंदे गटाची युती यशस्वी ठरली. भाजपला ८९ जागा, तर शिवसेना शिंदे गटाला २९ जागा मिळाल्या. दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाने मनसेसोबत युती केली होती, मात्र अपेक्षित यश मिळू शकले नाही. दरम्यान, आता राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं बिगूल वाजलं असून येत्या ५ तारखेला मतदान तर ७ तारखेला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीनंतर आता माढा तालुक्यात मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळत आहे. येथे शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले आहेत. भाजपच्या पॅनलविरोधात या चारही पक्षांनी एकत्र येत स्वतंत्र आघाडी उभारल्याने भाजपसमोरील आव्हान अधिक कठीण झालं आहे. ही महायुती माढ्याचे खासदार धैर्यशिल मोहिते पाटील आणि आमदार अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या एकत्रिकरणानंतर आता दोन्ही शिवसेनाही एकाच व्यासपीठावर आल्याने राजकीय वर्तुळात याला मोठा भूकंप मानलं जात आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही वेगळी आणि व्यापक युती उभारण्यात आल्याचं बोललं जात आहे. या युतीच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या माढ्यातील रांझणी येथे होणार असून, या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या मतदारसंघात भाजपविरोधात सर्वच प्रमुख पक्ष एकवटल्याने निवडणूक लढत अत्यंत चुरशीची ठरणार आहे. आता भाजप या एकत्रित विरोधकांचा मुकाबला कसा करणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.