Sanjay Raut : संजय राऊतांनी उठवली अजित पवारांवर टीकेची झोड ; अजित पवार नेते नाहीत, त्यांना इव्हीएमच्या कृपेने जागा मिळाल्या

मुंबईः राज्यभरात बीड प्रकरण चर्चेत असून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेचा सूर आवळला जात आहे. देशमुख हत्या प्रकरणावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून अद्याप त्यांच्या हत्येचे खरे मारेकरी बाहेरच आहेत, त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा खटला बाहेर चालवायला हवा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच अजित पवार हे महाराष्ट्राची अस्मिता अस्मिता करतात, पण जर ते महाराष्ट्राचे नेते असते तर त्यांनी बीड प्रकरणात जोपर्यंत त्यांना न्यायलय निर्दोष मानत नाही, आपल्या नेत्याला मंत्रिमंडळातून वगळले असते. असे मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली. अजित पवार हे नेते नाहीत, ते अपघाती नेते झालेले आहेत. ते हतबल आहेत. त्यांना इव्हीएमच्या कृपेने जागा मिळाल्या आहेत. असा टोला देखील राऊत यांनी अजित पवारांना लगावला.
सुरेश धस बोलतात आणि नंतर माघार घेतात. सुरेश धस हिमतीने उभे राहिले असते तर त्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि बीड पॅटर्नमुळे जो कलंक लागला आहे, तो धुण्यासाठी एक आमदार म्हणून नव्हे तर एक मराठी नगरिक म्हणून त्यांनी आपली लढाई चालू ठेवायला हवी. आम्ही त्यांच्यासोबत असल्याचे राऊत म्हणाले. तसेच सरकारकडून फसवणूक सुरु आहे. लाडकी बहिण, कर्जमाफी यासंदर्भात महायुती सरकारचा जाहीनामा बघावा, कर्जमाफीची वचने आहेत, कृषिमंत्री म्हणतात कर्जमाफी शक्य नाही. तुम्ही लोकांना फसवत आहात असा याचा अर्थ असल्याची टीका देखील राऊत यांनी सरकारवर केली आहे.
या गोष्टीचे शिवसेना समर्थन करत नाही
दिल्लीत काँग्रेस पक्षाने केजरीवाल यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न चालवला आहे. पण या गोष्टीला शिवसेनेचं समर्थन नाही. आम्ही एकत्र आहोत, एकत्र राहिलं पाहिजे. टीका वैगेर होऊ शकते राजकीय विरोध होऊ शकतो असे देखील ते यावेळी म्हणाले.




