Sanjay Raut : मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो; संजय राऊतांच सर्वात मोठं विधान, थेट म्हणाले….

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने जोरदार तयारी सुरू केली असून, यंदाच्या गुढीपाडवा मेळाव्याची घोषणा केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर होणार आहे. या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
टीझरने वाढवला उत्साह –
गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मनसेने एक खास टीझर जारी केला आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केलेल्या या एक मिनिटाच्या व्हिडीओत “गुढीपाडवा मेळावा २०२५” आणि “MNS Adhikrut” असं नमूद करण्यात आलं आहे. या टीझरमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, राज ठाकरेंच्या मोठ्या घोषणेची प्रतीक्षा वाढली आहे.
संजय राऊत म्हणतात….
दरम्यान, मनसे कडून यंदा गुढीपाडवा मेळावाच्या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधकार ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले आहे. त्यामुळे या पोस्टरची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. अश्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरे हे जीवंत असताना त्यांनी पत्रक काढून मनसेने त्यांचा फोटो वापरू नये असे सांगितले होते. आता मात्र बाळासाहेब ठाकरे यांचा समावेश हा राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये झाला आहे. त्यामुळे राष्ट्रपुरुषांचा फोटो वापरण्यावर आक्षेप घेता येत नाही, अशी भूमिका संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये उद्धवराज एकत्र येण्याची चर्चा सुरु आहे.
निवडणूक तयारी जोरात –
महापालिका निवडणुकांची चाहूल लागताच मनसेने आपली रणनीती आखायला सुरुवात केली आहे. गुढीपाडवा मेळावा हा त्याच दृष्टीने महत्त्वाचा मानला जातोय. राज ठाकरे यांच्या भाषणातून पक्षाची पुढील दिशा आणि निवडणूक रणनीती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे हा मेळावा मनसेच्या कार्यकर्त्यांसह राजकीय निरीक्षकांसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. गुढीपाडव्याच्या या मेळाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा टर्न येणार का, हे लवकरच कळेल!





