Raj Thackeray : …तर आज चित्र वेगळं असतं; राज ठाकरेंच्या भूमिकेवरून संजय राऊतांची टीका

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचा निकाल नुकताच लागला. या निकालात महायुतीला बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. या निवडणुकीत हाराकिरी झाल्याने त्यांची किरकिर वाढल्याचा आरोप महायुतीमधून करण्यात येत आहे. तर हा निकाल मान्य नसल्याचे उद्धव ठाकरे सेना आणि काँग्रेसनी भूमिका घेतली आहे. इतका एकांगी निकाल लागल्याने हा ईव्हीएमचा निकाल असल्याचा दावा महाविकास आघाडीकडून केला जात आहे. यादरम्यान संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे उमेदवार विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरवले होते. पण त्यांना या निवडणुकीत यश मिळाले नाही. जनतेने त्यांना जनादेश नाकारला. लोकसभेत राज ठाकरे यांनी भाजपाला जाहीर पाठिंबा दिला होता. तर यावेळी मनसेने अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले. पण त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यावर आता संजय राऊत यांनी तोंडसुख घेतले. राज ठाकरेंनी भाजपला मदत करण्याची भूमिका घेतली नसती तर आज चित्र वेगळं असतं, असे ते म्हणाले.
चंद्रचूड यांच्यावर टीका
निकालाच्या दिवशी पहिल्या दोन तासात बरोबरची लढाई होती. मात्र हा निकाल आधीच ठरलेला होता फक्त मतदान होऊ दिलं.याला जबाबदार कोण असेल तर सुप्रीम कोर्टचे माजी सरन्यायाधीश चंद्रचूड हे आहेत. अडीच वर्ष त्यांनी निर्णय दिला नाही. घटनात्मक पेचावर निर्णय देऊ शकले नाही त्यांना माफ करणार नाही. आमदारांमध्ये पक्ष बदलण्याची भीती राहिली नाही. चंद्रचूड यांचं नाव काळ्या अक्षराने लिहिले जाईल असे संजय राऊत म्हणाले आहेत.





