Sanjay Raut : एक चकली आणि एक लाडू दिला होता….; संजय राऊतांनी सांगितली तुरंगातील दिवाळीची आठवण

Sanjay Raut – ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना मागील वर्षी पत्राचाळ घोटाळा प्रकरणी 31 जुलै रोजी ईडीने अटक केली होती. त्यानंतर संजय राऊतांना सर्वात आधी ईडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात होते.
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीकरुन करण्यात आला होता. 102 दिवस जेलमध्ये मुक्काम केल्यानंतर अखेर संजय राऊतांची न्यायालयीन कोठडीतून मुक्तता करण्यात आली होती. यावेळी संजय राऊत यांना आपली दिवाळी तुरुंगातच साजरी करावी लागली होती.
दरम्यान, एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना संजय राऊत यांनी आपण तुरंगात कश्या पद्धतीने दिवाळी साजरी केली याबद्दल सांगितलं आहे. यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, “मी राजकीय कैदी असल्यामुळे इतर कैद्यांप्रमाणे तुरुंगाच्या आवारात मला स्वातंत्र्यपणे फिरण्याची मुभा नव्हती. त्यामुळे तुरुंगात दिवाळी कशी साजरी करतात? याची फारशी कल्पना नाही. पण तुरुंगाबाहेर फुटणाऱ्या फटाक्यांवरून दिवाळी असल्याचं समजत होतं, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, “ऑर्थर रोड तुरुंग मध्यवस्तीत आहे. आजूबाजूला सगळ्या चाळी आहेत. मराठी वस्ती आहे. तिथे पहाटेपासून दिवाळीचं वातावरण असतं. तुरुंगात असताना दिवाळीच्या आदल्या दिवशी घरून थोडासा फराळ आला होता. त्यासाठी आवश्यक परवानगी घेतली होती. त्याबरोबर एक उटण्याचं पाकीटही आलं होतं.
मग आम्ही तीन-चार लोकांनी ते उटणे वाटून घेतलं आणि स्वत:च स्वत:च्या अंगाला लावून घेतलं. घरी आई किंवा पत्नी अंगाला उटणे लावत असते. पण आम्ही स्वत:च्या हाताने उटणे लावून थंड पाण्याने आंघोळ केली. त्यानंतर एक चकली आणि एक लाडू होता, तो आम्ही खाल्ला, अशी आम्ही दिवाळी साजरी केली.”





