Sanjay Nirupam : उद्धव ठाकरे उघडपणे आझमींचा निषेध करूच शकत नाहीत; निरुपम यांनी लगावला टोला

मुंबई : शिवसेना नेते संजय निरुपम यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. काही दिवसांपूर्वी अबू आझमी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते त्यावर प्रतिक्रिया देताना संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
काय म्हणाले संजय निरुपम?
सर्वप्रथम, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हे मान्य करावे की अबू असीम आझमी हे महाविकास आघाडीचा भाग आहेत. जेव्हा आझमी यांनी निवडणूक लढवली तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला होता, आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतः शाल देऊन त्यांचे स्वागत केले. जर आपण एकनाथ शिंदेंबद्दल बोलत असू, तर जर कोणी विरोधी पक्षातून असेल तर त्यांना भेटण्यात काहीच गैर नाही. एका कार्यक्रमात टेबलावर बसलो होतो. पण याचा अर्थ असा नाही की आपण त्याला विरोध करणार नाही, उद्धव ठाकरेंची शिवसेना अबू असीम आझमी यांचा उघडपणे निषेध करू शकत नाही. कारण जर त्यांनी निषेध केला तर त्यांच्या मुस्लिम मतांना बाधा येईल, असं निरुपम यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसदेखील लगावला टोला
मुंबई काँग्रेस कार्यालयाला लवकरच टाळे लागणार आहे. पी. डब्ल्यू. डी. आवारात असलेल्या काँग्रेस कार्यालयाचे 18 लाख भाडे सरकारला दिलेले नाही. मागील अनेक महिन्याचे वीज बिल न भरल्यामुळे वीज कंपनीने मीटर काढून नेले आहे. काँग्रेस कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहा महिंन्यापासून पगार नाही. शिवसेना ठाकरे गटासोबत युती केल्यामुळे काँग्रेस संपली आहे असे संजय निरुपम म्हणाले.
अबू आझमी काय म्हणाले होते?
“चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिर बनवलेली आहेत. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जी लढाई होती, ती लढाई राज्य कारभाराची होती. ती लढाई कुठेही हिंदू आणि मुस्लिम अशी नव्हती” असे अबू आझमी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. यानंतर अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी यांना विधिमंडळातून निलंबित करण्यात आले आहे.





