Pune : सुनेत्रा पवारांवरील टीकेवरून संजय काकडेंचे शरद पवार, राहुल गांधींना पत्र; सपकाळांवर कारवाईची मागणी
Pune : सुनेत्रा पवार यांच्यावरील 'गुंगी गुडीया' वक्तव्यावरून माजी खासदार संजय काकडे यांनी शरद पवार आणि राहुल गांधी यांना पत्र लिहून हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर कारवाई, सार्वजनिक माफी आणि वादग्रस्त शब्द हटवण्याची मागणी केली आहे.

Pune : महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुंगी गुडीया म्हटल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व माजी खासदार संजय काकडे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार व काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे.
यामध्ये त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचे शब्द मागे घेऊन सार्वजनिक माफी मागावी, अशीही पत्राद्वारे मागणी केली आहे.
माजी खासदार संजय काकडे यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या राजकारणात सुसंस्कृतपणा आहे. राज्यातील राजकारणात महिलांचा कायम सन्मान व आदर करण्यात आला आहे. स्वतः शरद पवार यांनी राजकारणात नेहमीच महिलांचा आदर केला आहे आणि तसा वस्तुपाठ घालून दिला आहे.
सुनेत्रा पवार या केवळ महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री नाहीत तर, त्या पवार कुटुंबाच्या सून आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी कुटुंबातील ज्येष्ठत्वाच्या नात्याने या विषयाकडे पाहावे, अशी विनंती काकडे यांनी या पत्रात केली आहे. याबरोबरच आपण कोणत्याही राजकीय हेतूने हे पत्र लिहित नसून महाराष्ट्राच्या महिला उपमुख्यमंत्र्याबद्दल अशापद्धतीचे वक्तव्य मनाला लागल्यामुळे लिहित आहे.
काँग्रेस हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे आणि शरद पवार हे या आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या या विधानाचा तीव्र निषेध करावा आणि त्यांना माफी मागण्यास सांगावे. शरद पवारांनी याविषयी भूमिका मांडली तर त्याचा सर्व स्तरातून स्वीकार होईल आणि यापुढील काळात अशा पद्धतीने कोणीही महिला नेत्यांविषयी अशा पद्धतीने बोलू नये म्हणून दबाव निर्माण होईल, असेही पवारांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
याबरोबरच राहुल गांधी यांनाही संजय काकडे यांनी पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, देशात व्यक्ती स्वातंत्र्य व भाषण स्वातंत्र्य असले तरी, महिलांचा अशा प्रकारे उल्लेख करणे व त्यासाठी काँग्रेसच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करणे हे शोभा देणारे नाही. एकीकडे राहुल गांधी देशात यात्रा काढतात आणि प्रेमाचा संदेश देतात व दुसरीकडे त्यांचेच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ अशा प्रकारे एका वरिष्ठ स्तरावर कार्यरत असलेल्या महिला नेत्याचा अपमान करतात.
अजित पवारांचे दुर्दैवी निधन झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी तत्काळ उपमुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतली. त्या कार्यरत झाल्या असल्या तरी त्यांच्या मनातील दुःख अद्याप संपलेले नाही. दुःख बाजुला ठेवून त्या काम करीत आहेत. याचा विसर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना पडला आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना उद्देशून वापरलेले शब्द काँग्रेसच्या अधिकृत संकेतस्थळावरून हटवावेत. तसेच माजीमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही त्यांचे शब्द मागे घ्यावेत, असे राहुल गांधी यांना पाठवलेल्या पत्राद्वारे माजी खासदार संजय काकडे यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.





