Sanjay Dina Patil : संजय दिना पाटलांना आदित्य ठाकरेंचे खुले आव्हान; म्हणाले..
बंडखोरी करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांनी पत्रकारांना थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Sanjay Dina Patil : बंडखोरी करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांनी पत्रकारांना थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
“माझ्या घरासमोर फिरायचं नाही. आता बस्स झालं. रेकॉर्ड करून घ्या. कुणाकडे तक्रार करायची ते करा,” अशा अत्यंत आक्रमक आणि दमदाटीच्या भाषेत संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांनी उपस्थित पत्रकारांना धमकावले.
या प्रकरणाचा व्हिडिओ आणि ऑडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. पत्रकारांवर झालेल्या या हल्ल्यामुळे विरोधकांनी आता संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका करायला सुरुवात केली आहे.
‘ते मिंधेंच्या टोळीत गेलेत’ : आदित्य ठाकरेंचा घणाघात
या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. संजय दिना पाटील यांच्या वर्तणुकीचा समाचार घेताना ते म्हणाले की, बंडखोरी केलेले हे खासदार कोणत्याही अधिकृत शिवसेनेत गेलेले नाहीत, तर ते ‘मिंधेंच्या टोळीत’ सामील झाले आहेत.
या मिंधे टोळीची खरी संस्कृती आणि गुंडशाही आता संपूर्ण जगासमोर आली आहे. एका पळपुट्या खासदाराने सर्वांनाच धमकावण्याचे सत्र सुरू केले असून, आता त्यांनी थेट पत्रकारांवरही तोंडसुख घेतले आहे. आमचे खासदार संजय राऊत यांनी यापूर्वीच त्यांना ‘लाईनवर राहा, नाहीतर लाईनवर आणावे लागेल’ असा सज्जड दम भरला होता, याची आठवणही आदित्य ठाकरेंनी करून दिली.
‘पंतप्रधान हे सगळं पाहात आहेत का?’
आदित्य ठाकरे यांनी या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) वरिष्ठ नेत्यांवर आणि थेट पंतप्रधानांवरही निशाणा साधला. “हे जे काही सुरू आहे, ते भाजपचे वरिष्ठ नेते आणि पंतप्रधान पाहात आहेत की नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, जे लोक पक्ष सोडून पळाले आहेत, त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे राहिलेले नाही. त्यांना जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी स्वतःचा पैसा कसा वाढवायचा आणि बँक खात्यात भ्रष्टाचाराची कमाई कशी आणायची, यातच रस आहे.
‘लाज असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या’
संजय दिना पाटील यांच्यावर थेट हल्ला चढवत आदित्य ठाकरे म्हणाले की, पाटील हे आता जनतेचे लोकप्रतिनिधी राहिलेले नसून ते केवळ ‘मिंधे प्रतिनिधी’ बनले आहेत. ते सातत्याने लोकांना शिवीगाळ करत असून, धमक्या देणे आणि दादागिरी करणे एवढाच त्यांचा धंदा सुरू आहे.
जर त्यांच्यात थोडी जरी हिम्मत आणि लाज शिल्लक असेल, तर त्यांनी आजच्या आज आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि भाजप व मिंधेंच्या चेहऱ्यावर पुन्हा निवडणूक लढवून जिंकून दाखवावी, असे खुले आव्हान आदित्य ठाकरेंनी दिले.
लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
संजय दिना पाटील यांच्या नालायकपणाची सीमा पार झाली आहे, अशी टीका करत आदित्य ठाकरेंनी खासदारांना मिळणाऱ्या शासकीय सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, हे खासदार पत्रकारांना शिवीगाळ करतात, कार्यकर्त्यांना आणि सर्वसामान्यांना धमक्या देतात. मग यांना दिलेली सुरक्षा नक्की कशासाठी आहे? जनतेचे रक्षण करण्यासाठी की जनतेला यांच्यापासून वाचवण्यासाठी? सुरक्षा कशासाठी दिली आहे, याचा गृहखात्याने गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी या दादागिरीचा तीव्र शब्दांत निषेध केला.






