Sangvi Phata Accident – अपघातानंतर रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक तरुण, मदतीला धावून येण्याऐवजी हातात मोबाइल धरून व्हिडिओ चित्रीकरण करण्यात मग्न असलेली तरुणाई… माणुसकीला काळीमा फासणारा हा संतापजनक प्रकार मंगळवारी दुपारी सांगवी फाटा येथील बीआरटी मार्गावर पाहायला मिळाला. भरधाव कारने दिलेल्या धडकेत एका तरुणाचा उपचारादरम्यान अंत झाला. या प्रकरणात माणूसकी हरली अन् कंटेंट जिकला. मंगळवारी दुपारी नेहमीप्रमाणे सांगवी फाटा परिसरात वाहतुकीची वर्दळ होती. एक महाविद्यालयीन तरुण बीआरटी बसमधून उतरल्यानंतर रस्ता ओलांडत होता. त्याच वेळी बीआरटी मार्गातून नियम धाब्यावर बसवून आलेल्या (एमएच १४ वायबी ६४६५) या भरधाव कारने या तरुणाला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, तरुण हवेत उडून काही अंतरावर जाऊन पडला. अपघात घडताच चालक कारसह घटनास्थळावरून पसार झाला. अपघात झाल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. जखमी तरुणाच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत होता. अशा वेळी तिथे उपस्थित असलेल्या काही सुजाण नागरिकांनी तातडीने पुढे येत त्याला आधार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाची बाब म्हणजे, तिथल्या काही तरुणांनी मदतीचा हात पुढे करण्याऐवजी खिशातील मोबाइल बाहेर काढले. रस्ते अपघात अपघाताचे फोटो काढणे, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाचा व्हिडिओ बनवणे आणि ते सोशल मीडियावर कसे पटकन शेअर करता येईल, यातच ही तरुणाई धन्यता मानत होती. लाईक्स आणि व्ह्यूजच्या शर्यतीत एखाद्याचा जीव जात असतानाही कॅमेरा स्थिर ठेवण्याची ही मानसिकता आजच्या समाजाच्या नैतिक अध:पतनाचे जळजळीत उदाहरण ठरली आहे. मदतीचा हात देणारे देवदूत सर्वच जण संवेदनशून्य नसतात, हेही या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले. सोशल मीडिया नादात मग्न असलेल्या गर्दीतून काही जबाबदार नागरिक पुढे आले. त्यांनी तत्काळ रुग्णवाहिकेला फोन केला आणि कोणतीही वाट न पाहता खासगी वाहनाने जखमी तरुणाला जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पोलिसांचे आवाहन अपघाताच्या वेळी गोल्डन अवर (पहिले ६० मिनिटे) अत्यंत महत्त्वाचे असतात. फोटो किंवा व्हिडिओ काढण्यापेक्षा जखमीला रुग्णालयात नेल्यास त्याचे प्राण वाचू शकतात. नागरिकांनी संवेदनशील बनून मदतीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.