Sangli News : शिराळ्यात नागपंचमीला जिवंत नाग प्रदर्शनास परवानगी; स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण

शिराळा : शिराळ्यातील नागपंचमी उत्सवात जिवंत नाग प्रदर्शनास परवानगी मिळाल्याने स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्रालयाच्या वन्यजीव विभागाने २१ ग्रामस्थांना नाग पकडण्याची परवानगी दिली असून, यामुळे सर्प संवर्धन आणि पारंपरिक ज्ञानाचा प्रसार होण्यास चालना मिळेल. या यशाबद्दल शहरात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
आमदार सत्यजित देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांमुळे ही परवानगी मिळाली असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पत्रकार परिषदेत बोलताना देशमुख म्हणाले, “२००२ पासून न्यायालयीन बंधनात अडकलेल्या नागपंचमीला आता नवसंजीवनी मिळाली आहे. गृहमंत्री अमित शहा, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री गणेश नाईक, खासदार धैर्यशील माने आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या प्रयत्नांमुळे हे यश मिळाले. नागपंचमीला जागतिक धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत.”
नागरिकांना संयम आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करताना देशमुख यांनी नागपंचमी पारंपरिक पद्धतीने साजरी करताना अटी-शर्तींचे पालन करण्याचे सांगितले. यावेळी हणमंतराव पाटील, संपतराव देशमुख, रणजितसिंह नाईक, पृथ्विसिंग नाईक, विश्वप्रतापसिंह नाईक, सम्राट शिंदे, लालासो तांबीट, कुलदीप निकम, अभिजित शेणेकर, सचिन नलवडे, विनोद कदम, संभाजी नलवडे, अभिजित यादव आदी उपस्थित होते.






