Sangli News : शिराळ्यात नागपंचमीला कायद्याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करणार; पोलीस अधीक्षकांनी दिला इशारा

शिराळा : नागपंचमी उत्सव कायद्याच्या कचाट्यात आहे. निर्बंध असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू देऊ नका. जी मंडळे याचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिला. तहसीलदार कार्यालयात आयोजित शिराळा नागरिक आणि नाग मंडळे यांच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी उपवनसंरक्षक सागर गवते, प्रांताधिकारी सचिन थोरबोले, तहसीलदार श्यामला खोत, पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, तसेच पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक घुगे म्हणाले, ”कायदा सर्वश्रेष्ठ आहे. त्याचे उल्लंघन होईल असे कृत्य करू नका. तरुण वयात स्वतःवर गुन्हे नोंद करून आयुष्य उध्वस्त करू नये. वेळेची मर्यादा ही रात्री आठ वाजेपर्यंत आहे. डीजेची आवाज मर्यादा ४५ डेसिबल असावी त्यापुढे आवाज गेल्यास संबंधित मंडळावर गुन्हे दाखल केले जातील. ध्वनीयंत्र मशीनने मर्यादा तपासून योग्य ती कारवाई होईल.
कर्णकर्कश आवाज आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. उच्च न्यायालयाचे निर्देश असल्याने बंधने असणार आहेत. सर्पमित्रांनी साहसी प्रकार करू नयेत. रस्ते, वीज, वाहतूक याबाबत जागरूकता असावी. आपत्कालीन सेवेला रस्ता मोकळा करून द्यावा. मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पुरावा म्हणून त्याचा वापर केला जाईल. सामाजिक व जातीय सलोखा राखून नागपंचमी साजरी करा.
सोशल मीडियावर आक्षेपार्ह प्रकार करू नका. तसे केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील. पोलीस प्रशासनास सहकार्य करा. ज्या मंडळानी स्वागत कमानी उभ्या केल्या आहेत त्या कमानीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या. एखादी दुर्घटना घडू नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सम्राट शिंदे, श्रीराम नांगरे, रामचंद्र पाटील, सचिन शेटे यांनी आपले म्हणणे मांडले. बैठकीस पृथ्वीसिंग नाईक, प्रमोद नाईक, रणजितसिंह नाईक, सचिन नलवडे, अभिजित शेणेकर, जयसिंग गायकवाड, लालासो ताबीट, विरेंद्र पाटील, वैभव कुंभार, वसंत कांबळे, सुधाकर कुंभार, फिरोज मुजावर, धन्वंतरी ताटे, सतीश सुतार, अजय जाधव, राम पाटील, संदीप देशमुख, प्रमोद चौधरी, आदी मान्यवर आणि शिराळा शहरातील मंडळे उपस्थित होते.





