Bhandara News : काँग्रेसच्या महिला नेत्या संगीता बेनीवाल यांच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना भंडाऱ्यात समोर आली आहे. या अपघातात वाहनाचा मोठा चुराडा झाला असला तरी सुदैवाने जीवितहानी टळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तुमसर येथील खापा चौकात दोन कारमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. समोरून येणाऱ्या भरधाव कारने बेनीवाल यांच्या वाहनाला धडक दिल्याने त्यांच्या कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. या अपघातात कारचालक किरकोळ जखमी झाला असून इतर सर्वजण सुरक्षित बचावले आहेत. अपघाताच्या वेळी बेनीवाल यांच्यासोबत कुंदा राऊत, मोहन पंचभाई आणि जयश्री बोरकर उपस्थित होते. संगीता बेनीवाल या गेल्या तीन दिवसांपासून भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. तुमसर येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आटोपून त्या नागपूरकडे जात असताना हा अपघात घडला. या घटनेमुळे खापा चौकात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.