संगमनेर | प्रवरा नदीपात्रात विद्यार्थी बुडाला

संगमनेर (प्रतिनिधी) – प्रवरानदीच्या पात्रात अवैध वाळू उपशामुळे झालेल्या खड्ड्यांमधील पाण्यात बुडून बळी जाण्याच्या घटना सुरूच आहे. मंगळवारी (दि.16) सायंकाळी प्रवरा नदीपात्रात एक पंधरा वर्षीय विद्यार्थी बुडल्याची घटना घडली. या घटनेला एक दिवसाहून अधिक कालावधी उलटूनही विद्यार्थीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. यश कृष्णा आडेप असे विद्यार्थ्याचे नाव आहे.
यश हा मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास बुडाला होता. या घटनेने संगमनेरमधील पद्मनगर परिसरात शोककळा पसरली आहे. पद्मनगर वसाहतीमध्ये राहणारा यश हा आपल्या अन्य चौघा मित्रांसह मंगळवारी (दि.16) सायंकाळी संगमनेर खुर्दजवळील प्रवरा नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता.
यावेळी छोट्या पुलानजिक वाळूतस्करांनी केलेल्या खड्ड्यात दोघे बुडू लागल्याने त्यांना वाचवण्यासाठी यश तेथे गेला. मात्र बुडणार्या त्या दोघांनी त्यालाच मिठी मारल्याने तो बुडाला. यावेळी नदी किनारी असलेल्या एकाने ही घटना पाहिले.
त्याने नदीपात्रात उडी घेत त्या दोघांना वाचवले. मात्र यशचा थांगपत्ता लागला नाही. सायंकाळी उशीराने तहसीलदार अमोल निकम, पालिकेचे प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल यांनीही नदीकाठी जावून पोहणार्यांच्या मदतीने यशच्या मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा शोध लागला नाही.




