nagar | संगमनेर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याची लाचलुचपतकडे तक्रार

संगमनेर, (प्रतिनिधी) – प्रतिबंधात्मक कारवाई करणाऱ्या शहर पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याची मनमानी वाढली असून, या कर्मचाऱ्याला इतरांप्रमाणे कधी रात्रीचे काम दिलेच जात नाही तर जनरल कामही दिले जात नाही. त्यामुळे हा कर्मचारी साध्या कपड्यावरच पोलीस ठाण्यात वावरत असताना दिसता.
येणाऱ्या संशयित आरोपीला तासनतास बसून उद्धटपणाने बोलून मलिद्याची मागणी करत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे. याच कर्मचाऱ्याविरोधात लाचलुचपत विभागाकडेही अनेकांनी तक्रारी केल्याचे समजते.
दरम्यान, शहर पोलीस ठाण्यात २१ महिला पोलीस कर्मचारी आहे. त्यामध्ये अनेक महिला पोलीस नाईक आहे. मात्र, त्यांच्याकडे प्रतिबंधात्मक कारवाईचे काम दिले नाही. पण, एका पोलीस महिला शिपाईकडे हा चार्ज दिला. याच महिलेचे पोलीस ठाण्यातील कोणत्याही कर्मचाऱ्यांशी जमत नाही. वारंवार या कर्मचारी महिलेचे पोलीस ठाण्यात वाद होतात.
येणाऱ्या आरोपीला खाकीचा रुबाब दाखवत असल्याने मलिदा घेत असल्याची चर्चा आहे. तसे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी ग्रुपवर मेसेज करून कळविले की, प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये कोणी ही पैश्याची मागणी करू नये, तशा तक्रारी लाचलुचपत विभागाकडे जात आहेत.
या मेसेजला देखील केराची टोपली दाखवून या महिलेकडून मलिद्याच्या मागणीत वाढ होत आहे. खरंतर, एक पोलीस उपनिरीक्षकाची प्रतिबंधात्मक कारवाईवर सही असते. मात्र, रुबाब या महिला कर्मचारीचा असतो. “चहा पेक्षा किटली गरम” अशी परिस्थिती शहर पोलीस ठाण्यात आहे.
अनेक कर्मचाऱ्यांनी त्या महिला कर्मचाऱ्याविरोधात वरिष्ठांना तक्रारी केल्या आहेत. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनीही त्यांच्या ग्रुपमध्ये खडसावले असून अद्यापही काहीच फरक पडला नसल्याने काही कर्मचाऱ्यांनी थेट वरिष्ठांना कळवणार असल्याचे बोलले जाते. आता त्या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.




