संगमनेर शहरानजीक ट्यूबच्या साह्याने वाळूचोरी

संगमनेर – संगमनेर बाह्यवळ रस्त्यावरील प्रवरा नदीपात्रात पुणे नाशिक महामार्गावर उभारलेल्या नवीन पुलालगत कासारवाडी शिवारातून ट्यूबच्या सहाय्याने वाळूचोरांनी दिवसरात्र बेकायदा उत्खनन करून नदीपात्रात धुडगूस घातला आहे. या वाळू चोरीकडे स्थानिक महसूल आणि पोलीस प्रशासनाने सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याने स्थानिक नागरिक हवालदिल झाले आहेत.
प्रवरा नदीपात्रात संगमनेर शहरासह नजीकच्या बहुतांश ठिकाणी खुलेआम मोठ्या प्रमाणात राजरोस वाळूचोरी सुरु आहे. नदीला पाणी असल्याने वाळू तस्कर प्रमुख्याने ट्यूबचा वापर करत आहे. शहरापासूनच हाकेच्या अंतरावर असलेल्या कासारवाडी शिवारात प्रवरा नदीपात्रात पाणी असताना देखील जवळपास वीस ते तीस वाळू तस्कर दिवसाढवळया अवैधरित्या वाळू उपसा करत आहे. विशेषबाब म्हणजे पाण्यातून ही वाळू कशी बाहेर काढायची त्यासाठी या वाळू तस्करांनी चांगलीच शक्कल लढवली आहे.
प्लास्टीकच्या गोण्यांमध्ये ही वाळू भरायची आणि ती ट्युबच्या सहाय्याने आल्हादपणे बाहेर काढायची टूपच्या माध्यमातून तीन ते चार वाळूने भरलेल्या गोण्या बाहेर काढता येत आहे. त्यानंतर रिक्षातून वाळू तस्कर या गोण्यांची वाहतूक करत आहेत. पुणे नाशिक महामार्गावर उभारलेल्या नवीन पुलावरून हा सर्व प्रकार नागरिकांना दिसत असला तरी स्थानिक महसूल आणि पोलीस प्रशासनाने अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहे. बुधवारी दुपारी जवळपास पाचशे ते सहाशे वाळूने भरलेल्या गोण्यांचा ढीग या भागात पहावयास मिळाला.
स्थानिक पोलिसांचे कारवाईकडे दुर्लक्ष
उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडीत यांनी मुळा आणि प्रवरा नदीपात्रात मागील काही दिवसात ठिकठिकाणी छापे टाकत वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र दुसरीकडे संगमनेर शहराच्या हाकेच्या अंतरावर वाळू चोरी होत असताना शहर पोलीस कारवाई करताना दिसत नाही. शहरातून राजरोस वाळू वाहतूक सुरु असताना पोलीस मात्र सर्वकाही आलबेल असल्याचे दाखवत आहे.
अवैध वाळू उपशावरील महसूलची कारवाई थंडावली
महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची गेल्या काही दिवसांपासून वाळू तस्करांविरोधातील कारवाई अचानक थंडावली असून, त्याचा परिणाम म्हणून तालुक्यातील नदीपात्रात वाळूतस्करांनी मागील काही दिवसांपासून हैदोस घातला आहे. काही कर्मचारी नदीपात्रात वाळू असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात तोडपानी परताना दिसत आहे. त्याच्यावर स्थानीक अधिकाऱ्याचा कोणताही धाक न राहिल्याचे चित्र आहे.





