Sandesh Pawar : आईसाठी मुलाचं अनोखं प्रेम! २४ वर्षीय संदेशने गुडघ्यांवरून सर केला रायगड, राजदरबारात घातला दंडवत
Sandesh Pawar : ‘स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी’ या उक्तीचा सजीव प्रत्यय देणारी एक अत्यंत भावूक आणि प्रेरणादायी घटना समोर आली आहे.

Sandesh Pawar : ‘स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी’ या उक्तीचा प्रत्यय देणारी कृती २४ वर्षीय संदेश तुकाराम पवार या तरुणाने केली. आई गंभीर आजारातून सुखरूप बरी व्हावी, यासाठी किल्ले रायगडावर गुडघ्यावरून चालत येण्याचा नवस केलेल्या संदेशने रविवारी (दि.२७) तो पूर्ण केला. संपूर्ण गड गुडघ्यावरून चढून त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजदरबारात तसेच समाधीस्थळी दंडवत घालून आईच्या आरोग्यासाठी केलेली प्रतिज्ञा पूर्ण केली. (Sandesh Pawar)
पोलादपूर तालुक्यातील ढवळे गावचे रहिवासी असलेले संदेश पवार गेल्या काही वर्षांपासून मोठ्या भाऊ-बहिणीसह आईसोबत कोपरखैरणे येथे वास्तव्यास आहेत. संदेश एका इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत खासगी नोकरी करतो. काही दिवसांपूर्वी त्याची आई गंभीर आजारी पडल्याने तिला मुंबईतील सत्यम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. (Sandesh Pawar)
तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर संदेशने आई सुखरूप बरी झाल्यास रायगडावर गुडघ्यावरून चालत जाण्याचा नवस केला होता. उपचारांना प्रतिसाद मिळाल्याने त्याच्या आईची प्रकृती सुधारली आणि ती सुखरूप घरी परतली. त्यानंतर संदेशने नवस पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. (Sandesh Pawar)
रविवारी (दि.२७) सकाळी साडेसातच्या सुमारास संदेशने किल्ले रायगड चढण्यास सुरुवात केली. गुडघ्यावरून मार्गक्रमण करत तो सायंकाळी पाचच्या सुमारास गडावर पोहोचला. गडावर पोहोचल्यानंतर त्याने राजदरबार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन दंडवत घालत नवसपूर्ती केली. (Sandesh Pawar)
नवस पूर्ण केल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास माणगाव येथून एसटीने संदेश कोपरखैरणे येथील घरी सुखरूप परतला. संदेशला दोन बहिणी आणि एक मोठा भाऊ आहे. वडिलांचे लहानपणीच निधन झाले असून, ढवळे येथील त्याचे नातेवाईक सध्या गुजरातमध्ये वास्तव्यास असल्याचे त्याने सांगितले. (Sandesh Pawar)
रायगडावर जाणाऱ्या अनेक शिवभक्तांनी संदेशच्या मातृप्रेमाची आणि श्रद्धेची दखल घेत त्याचे कौतुक केले. त्याच्या आईला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, अशा शुभेच्छाही शिवभक्तांनी दिल्या. (Sandesh Pawar)

