9 वर्षांनी पुन्हा रिलीज झालेल्या ‘या’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, नवीन सिनेमांनाही टाकले मागे

Sanam Teri Kasam Re-release: 2016 मध्ये आलेल्या ‘सनम तेरी कसम’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची अद्याप घोषणा झालेली नाही. मात्र, त्याआधी 9 वर्षांनी ‘सनम तेरी कसम’ला पुन्हा मोठ्या पडद्यावर रिलीज करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
‘सनम तेरी कसम’ने री-रिलीज झाल्यानंतर दोनच दिवसात 9 कोटींची कमाई केली. चित्रपटाने रिलीजच्या दिवशी 4 कोटी आणि दुसऱ्या दिवशी 5 कोटी रुपयांची कमाई केली. अशाप्रकारे, चित्रपटाने दोनच दिवसात मूळ रिलीजच्या वेळी झालेल्या कमाईपेक्षाही अधिक कलेक्शन बॉक्स ऑफिसवर केले आहे. या चित्रपटाने त्याच्या ऑरिजिनल रिलीजचा देखील विक्रम मोडला आहे. 2016 मध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 8 कोटी 3 लाख रुपयांची कमाई केली होती.
‘सनम तेरी कसम’ हा व्हेलेंटाईन वीकच्या निमित्ताने 7 फेब्रुवारीला पुन्हा थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. हर्षवर्धन राणे आणि मावरा होकेन या कलाकारांना पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये मोठी गर्दी करत आहेत.
राधिका राय आणि विनय सपरू यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या या चित्रपटाचे री-रिलीज ओपनिंग डे कलेक्शन 4 कोटी रुपये होते. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 5 कोटी रुपयांची कमाई केली. 2015 मध्ये फक्त 25 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती.
एकीकडे हिमेश रेशमियाचा ‘बॅडएस रवि कुमार’ आणि खुशी-जुनैद यांचा ‘लवयापा’ हे नवीन चित्रपट देखील थिएटरमध्ये रिलीज झाले आहेत. मात्र, ‘सनम तेरी कसम’ने सर्वांना मागे टाकत बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. या चित्रपटाने री-रिलीजच्या ओपनिंग दिवशीच 3 लाख तिकिटे विकून कमाल केली आहे. त्यामुळे हा चित्रपट कमाईचे आणखी नवीन विक्रम मोडणार का? हे पाहणे मजेशीर ठरेल.





