Samudra se Samriddhi: पंतप्रधान मोदींचा भावनगरमधून मोठा संदेश, कोणत्या शत्रूला हरवण्याचं दिलं आव्हान?

Samudra se Samriddhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी गुजरातमधील भावनगर येथे आयोजित ‘सागरातून समृद्धी’ कार्यक्रमात आत्मनिर्भर भारताचा संकल्प पुन्हा एकदा मांडला. यावेळी त्यांनी देशवासियांना परदेशी वस्तूंवरील अवलंबित्व कमी करून ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं. या कार्यक्रमात त्यांनी 34,200 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचा शिलान्यास केला.
आमचा सर्वात मोठा शत्रू: परदेशी अवलंबित्व –
पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारताचा कोणताही मोठा शत्रू जगात नाही. जर खरा शत्रू असेल, तर तो म्हणजे परदेशांवर अवलंबून राहण्याची आपली सवय. जितकं जास्त परदेशी अवलंबित्व, तितकीच मोठी अपयशाची खाई. हा शत्रू आपल्याला हरवायलाच हवा.” त्यांनी पुढे सांगितलं, “आज भारत ‘विश्वबंधू’च्या भावनेसह पुढे जात आहे. जगात शांतता, स्थैर्य आणि प्रगतीसाठी सर्वात मोठ्या लोकसंख्येचा देश आत्मनिर्भर होणं गरजेचं आहे.”
India’s ports are the backbone of our nation’s rise as a global maritime powerhouse. Addressing the ‘Samudra Se Samriddhi’ programme in Bhavnagar. https://t.co/T7k56n99Gd
— Narendra Modi (@narendramodi) September 20, 2025
आत्मनिर्भर भारत: सर्व समस्यांचं एकमेव औषध –
“जर आपण परदेशांवर अवलंबून राहिलो, तर आपल्या आत्मसन्मानाला धक्का बसेल. 140 कोटी देशवासियांचं भविष्य आपण दुसऱ्यांच्या हातात सोपवू शकत नाही. देशाच्या विकासाचा संकल्पही दुसऱ्यांच्या मदतीवर अवलंबून राहू शकत नाही. आपण येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य धोक्यात घालू शकत नाही. सगळ्या समस्यांवर एकच औषध आहे, आणि ते म्हणजे आत्मनिर्भर भारत,” असं मोदींनी ठणकावून सांगितलं.
काँग्रेसवर टीकास्त्र –
आपल्या भाषणात मोदींनी मागील काँग्रेस सरकारवरही जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, “जागतिकीकरणाच्या काळात काँग्रेसने आयातीकडे जाण्याचा मार्ग निवडला आणि त्यातही कोट्यवधींचे घोटाळे केले. यामुळे भारताची खरी ताकद दडपली गेली.”
34,200 कोटींच्या प्रकल्पांची भेट –
या कार्यक्रमात पंतप्रधानांनी 34,200 कोटींहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचा शिलान्यास केला. यामध्ये सागरी आणि स्थानिक पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्पांचा समावेश आहे. “हा केवळ भावनगरचा कार्यक्रम नाही, तर संपूर्ण देशासाठी ‘सागरातून समृद्धी’च्या प्रवासाचं प्रतीक आहे,” असं मोदी म्हणाले. पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार, यामध्ये मुंबई इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनलसह 7,870 कोटींच्या सागरी प्रकल्पांचा उद्घाटन आणि शिलान्यास यांचा समावेश आहे.
सेवा पखवाडा आणि जनसहभाग –
पंतप्रधानांनी सांगितलं की, 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात ‘सेवा पखवाडा’ साजरा केला जात आहे. केवळ गुजरातमध्येच एक लाख लोकांनी रक्तदान केलं आणि 30,000 हून अधिक ठिकाणी आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं, जिथे महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यात आलं.
आत्मनिर्भर भारताचा नारा –
पंतप्रधानांनी देशवासियांना पुन्हा एकदा ‘मेड इन इंडिया’ला प्रोत्साहन देण्याचं आवाहन करताना परदेशी अवलंबित्व कमी करण्याचा संदेश दिला. “आत्मनिर्भर भारत हाच आपल्या प्रगतीचा आणि समृद्धीचा मार्ग आहे,” असं सांगत त्यांनी उपस्थितांना प्रेरणा दिली.





