एकनाथ शिंदेचा खासदार अडचणीत? समृद्धी महामार्गात 1,150 कोटींचा घोटाळा? गंभीर आरोपाने खळबळ
Samruddhi Mahamarg Scam : समृद्धी महामार्गावरील जटवाडा येथील जमिनीवरून अंबादास दानवे यांनी खासदार संदीपान भुमरे यांच्यावर १,१५० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे.

Samruddhi Mahamarg Scam : समृद्धी महामार्गावरील जटवाडा परिसरातील जमिनीच्या व्यवहारावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांच्यावर तब्बल १,१५० कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचा आरोप केला आहे.
ड्रायव्हरच्या नावावर ‘हिबानामा’?
दानवे यांच्या आरोपानुसार, जटवाडा येथील २३ एकर ३० गुंठे जमीन भुमरे यांच्या ड्रायव्हर जावेद रसूल शेख यांच्या नावावर ‘हिबानामा’ करून हस्तांतरित करण्यात आली. विशेष म्हणजे हा हिबानामा १९७१ सालचा दाखवण्यात आल्याचा दावा आहे.
मात्र संबंधित व्यक्तीचा जन्म १९८५ मध्ये झाल्याचे सांगितले जात असल्याने व्यवहारावर संशय निर्माण झाला आहे. “१९७१ मध्ये जन्मच झाला नव्हता, तर त्याच्या नावावर हिबानामा कसा?” असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे.
ही जमीन समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली असून संपादन मूल्य सुमारे १,१५० कोटी रुपये निश्चित झाल्याचे सांगितले जाते. इतक्या मोठ्या मोबदल्यासाठी मालकी हक्काचे दावे पुढे करून गैरव्यवहार झाल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.
सीआयडी चौकशीची मागणी
या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी दानवे यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. “चौकशी झाल्यास सत्य बाहेर येईल,” असा त्यांचा दावा आहे.
भुमरेंनी आरोप फेटाळला
दरम्यान, खासदार संदीपान भुमरे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. “कोणताही हिबानामा झालेला नाही. जावेद रसूल हा माझा ड्रायव्हर असला तरी त्याचा या व्यवहाराशी काहीही संबंध नाही. आरोप सिद्ध करून दाखवावेत,” असे भुमरे यांनी स्पष्ट केले. या आरोप-प्रत्यारोपांमुळे छत्रपती संभाजीनगरसह राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली असून चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.





